⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

काँक्रिटीकरणाचे काम रखडल्याने वाहतूकीचा खोळंबा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । कजगाव शहरातील सर्वाधिक रहदारीचा कजगाव रस्त्याच्या काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येत असून अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत असताे. याचा सर्वाधिक त्रास या भागातील कॉलनी धारकांना सहन करावा लागताे. परिणामी या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार चिमणराव पाटील यांनी लक्ष घालून रखडलेला कामाला चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.


चार महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या रुंदीकरण कामाला सुरुवात झाली होती. यापूर्वी ठेकेदाराने काही काम केल्यानंतर ते काम बंद केले होते. ‘दिव्य मराठी’ने यासंदर्भात वृत्त दिल्यानंतर हे काम पुन्हा सुरू झाले होते. तर या मार्गावरील वीजेचे खांब व राेहित्राची जागा न बदवल्याने ठेकेदाराने हे काम पुन्हा बंद ठेवले होते. त्यानंतर अर्धे काम करून आता पुन्हा ठेकेदाराने हे काम बंद केले.

रुंदीकरणामुळे या रस्त्यावरील चिखल व वाहतूक कोंडी समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. परंतु हे काम वारंवार रखडत असल्याने वाहतूक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. आमदार चिमणराव पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून हे काम तातडीने पुर्ण करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.
पारोळा कजगाव रस्त्याचे रखडलेले काम.