जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । समतावादी साहित्य शिक्षक मंडळातर्फे बांभोरी येथील एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ शिक्षकांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यात जयंत अजय भामरे यांच्या स्वरचित ‘क्रांतीलहर’ काव्यसंग्रहाचे जेष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डायट प्राचार्य डॉ.अनिल झोपे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, एरंडोल गट शिक्षणाधिकारी विश्वास पाटील, प्रशांत पब्लिकेशनचे प्रदीप पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वास पाटील, समतावादी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच समतावादी साहित्य शिक्षक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सहसचिव, खजिनदार सर्व सदस्य व महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
समता शिक्षक परिषद एक शैक्षणिक व सामाजिक संस्था आहे. त्या परिषदेने महाराष्ट्रात आगळा प्रयोग राबविला. एकाच वेळी 14 पुस्तके प्रकाशन करून जळगाव जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिकांनी मेहनत घेऊन पुस्तके निर्मिती केली. विविध साहित्य रचना करून शिक्षक हा साहित्यिक होऊ शकतो त्याला संधी मिळाली तर त्याला भावविश्व विस्तारित करता येते.
सदर पुस्तकाला प्रा. शुक्राचार्य गायकवाड यांची प्रस्तावना लाभली असून यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ‘क्रांतीलहर’ या पुस्तकाच्या वैशिष्ट्ये सांगताना चौफेर मांडणी करणारा वास्तववादी कवी अशी अजय भामरे यांची स्तुती करून भावी आयुष्यात मोठी जडणघडण होऊन कवीला सुगीचे दिवस येतील असे भाष्य केले.