⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | युवारंगातून मैत्री व बंधुभावाचा तरुणाईने प्रसार करावा – कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी

युवारंगातून मैत्री व बंधुभावाचा तरुणाईने प्रसार करावा – कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । मानसिकता व विचारधारा बदलणे व्यक्ती विकासासाठी आवश्यक आहे. क्षमता आणि ज्ञानास गुरुस्थानी मानत आत्मविश्वासाला सकारात्मक विचारांनी श्रेष्ठत्व प्राप्त करून द्यावे.युवारंग सारख्या उपक्रमातून मैत्री व बंधुभावाचा तरुणाईने प्रसार करावा,असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.   

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय तसेच कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “युवक महोत्सव 2021 युवारंगच्या” उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या समारोहाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील हे होते.

यावेळी आमदार राजेश पाडवी, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्रीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक बंडू पाटील, सातपुडा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग आहेर, डॉ. कांतीलाल टाटिया, प्र. कुलसचिव डॉ. किशोर पवार, विद्यार्थी विकास संचालक डॉ.सुनील कुलकर्णी, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, प्रा. डॉ. मोहन पावरा,विवेक लोहार, मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील,प्राचार्य डॉ.आर. एस. पाटील,प्राचार्य डॉ. एस. पी. पवार,प्राचार्य डॉ. डी. एम. पाटील, प्राचार्य डॉ.एन.जे. पाटील, प्राचार्य बी.के.सोनी, प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल, प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, उपप्राचार्य इंदिरा पटेल, पर्यवेक्षिका प्रा. कल्पना पटेल यांची उपस्थिती होती.   

 कुलगुरू डॉ. माहेश्वरी पुढे म्हणाले, जोश-उत्साह व चैतन्य हे संसर्गजन्य असून प्रत्येक व्यक्ती त्याकडे आपोआप आकर्षित होत असते. महाविद्यालयीन युवकांच्या सुप्त गुणांना मंच उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजच्या तरुणांसमोर प्रगल्भ नेतृत्वाची गरज असून पारंपारिक विचारधारा व मानसिकता त्यागणे सद्यस्थितीत आवश्यक आहे. तरुणाईला योग्य संगत मिळणे तेवढेच गरजेचे आहे. संगत चुकली तर दिशा चुकते व पश्चातापाची वेळ येते हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. जीवनात वेळेचे महत्त्व समजून घेत भौतिक वस्तू बदलण्यापेक्षा स्वतःचे आचार-विचार योग्यतेप्रमाणे बदलणे गरजेचे आहे. तरुणांनी गरुडभरारीची ओढ मनात ठेवावी. सध्या आम्ही रोजगार मागणा-यापेक्षा देणारे झालो असून ही विचारधारा देशाला सर्वोच्च उंचीवर नेणारी आहे. डॉ. माहेश्वरी यांनी मराठी-हिंदी-इंग्रजी भाषेसह शेरोशायरीने तरुणाईची मने जिंकली.     अध्यक्षीय समारोपात मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील म्हणाले, त्याग आणि समर्पणाने प्रत्येक व्यक्ती उत्तूंग शिखर गाठू शकतो.जीवन जगतांना विश्वास कोणावर व किती ठेवावा हे आपण स्वतः ठरवावे. युवा वर्गाने विकासासाठी समाज आणि देशासोबत चालावे.प्रत्येकाने वेळेसोबत बुद्धीचा योग्य वापर केला तर अशक्य काहीच नसते. मात्र निर्णय घेताना चुकलो तर जन्मदात्यांना दुःख होते हे लक्षात ठेवावे. विद्याश्रम परिवारात त्यागास अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

   तत्पूर्वी युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक बंडू पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, आमदार राजेश पाडवी यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. युवारंगची शपथ जागृती पाटील या विद्यार्थिनीने दिली. यावेळी पिंपळनेर महाविद्यालयातील चंद्रकला गावित या विद्यार्थिनीचा एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला. समारोहाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.सुनील कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. आभार युवारंगचे समन्वयक प्रा. डॉ.आय.जे. पाटील यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विविध महाविद्यालयांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारींसह तरूणाई उपस्थित होती.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह