जळगावात १२ तासात दोन भीषण अपघात: आयशरने पायी जाणाऱ्या तरुणाला उडवले
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच आहे. बुधवारी रात्री अजिंठा चौकात भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना ताजी असताना पायी जाणाऱ्या तरुणाला भरधाव आयशरने उडवले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी कृषी समितीजवळ घडलीय.
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अजय सिताराम कोळी (वय २६) असून तो धरणगाव तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील रहिवासी होता. आज सकाळी भुसावळकडून जळगावकडे जाणारा एक आयशर वेगाने जात असताना कृषी समितीजवळ पायी जाणाऱ्या अजय कोळी याला जोरदार धडक दिली. या धडकेत अजय जागीच ठार झाला.
या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. मयताच्या खिशातील कागदपत्रामुळे त्यांची ओळख पटली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, बेशिस्त वाहतुकीमुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. जळगाव शहरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे खूप संताप आहे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची मागणी केली जात आहे.