पोहोण्याचा मोह जीवावर बेतला; एकुलता एक मुलाचा तलावात बुडून मृत्यू
तलावावर जाऊन पोहोण्याचा मोह एका बारावीच्या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला आहे. तलावात बुडून १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना अमळनेर तालुक्यातील धार येथील पाझर तलावात घडली. जयेश दीपक पाटील (वय १८) असे मयत तरुणाचे नाव याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, मूळ कंडारी येथील रहिवाशी असलेला जयेश शिक्षणासाठी जळगाव शहरातील अयोध्या नगरात खोली घेऊन राहत होता. प्रताप महाविद्यालयात अकरावी झाल्यानंतर त्याने बारावीसाठी मारवड येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.
दरम्यान, जयेश आणि आणखी दोघे जण शुक्रवारी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे समजते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो पाण्यात बुडाला. दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत ठाण्याचे पोहेकाँ सुनील तेली, पोहेकाँ मुकेश साळुंखे यांच्यासह नागरिकांनी यांनी सदर तरुणाचा मृतदेह तलावातून काढला. रुग्णालयात नेला असता तेथे डॉक्टरांनी जयेशला मयत घोषित केले. दरम्यान, जयेश हा दीपक भरत पाटील यांचा एकुलता एक मुलगा आहे. जयेशच्या मृत्यूने कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला.