जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमधील कुसुंबा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात १९ वर्षीय मुलाने आई-वडील बाहेर गावी गेले असता टोकाचं पाऊल उचललं आहे. या तरुणाने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची समोर आलीय. कुणाल दत्तात्रय पाटील असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुणाल पाटील हा आई-वडील आणि लहान भावासह कुसुंबा गावात वास्तव्यास होता. कुणाल याचे वडील मालवाहू वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना हातभार लागावा म्हणून कुणाल याने शिरसोली रस्त्यावर पोल्ट्री फार्म सुरू केले होते. कधी-कधी तो वडिलांसोबत मालवाहतूक वाहनांवर पाण्याचे जार वाटप करण्याचेही काम करायचा.
बुधवारी सकाळी आई-वडील काही कामानिमित्त जामनेरला गेले होते. त्यामुळे कुणाल आणि त्याचा लहान भाऊ हे दोघे घरीच होते. सकाळी जार वाटप केल्यानंतर दुपारी मित्रांसोबत त्याने वेळ घालवला. दुपारी घरी आल्यानंतर तो दुसऱ्या मजल्यावर गेला. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. लहान भाऊ हा खालच्या खोलीत होता. दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास जवळच राहणारी कुणाल याची आत्या ही कुणालला शोधत दुसऱ्या मजल्यावर गेली, तेव्हा त्यांना कुणाल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला, त्यांनी लागलीच ही घटना इतरांना सांगितली.
नंतर कुणाल याला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांसह मित्र मंडळींची एकच गर्दी झाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.