जळगाव जिल्हागुन्हे

नशिराबादमध्ये तलवार घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । नशिराबाद शहरातील ताजनगर परिसरात हातात उघडी तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाविरुद्ध नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. १६ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ३३ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गावातील ताजनगर परिसरात एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन फिरत असून, परिसरात दहशत निर्माण करत आहे. या माहितीची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत ताजनगर परिसरात सापळा रचला. यावेळी माहितीतील वर्णनाशी मिळताजुळता एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन फिरताना आढळला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला जागीच ताब्यात घेतले.

१,१०० रुपयांची तलवार जप्त

पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित तरुणाने आपले नाव शेख अल्ताफ शेख रऊफ (वय २८, रा. ख्वाजा गरीब नगर, नशिराबाद, ता. जि. जळगाव) असे सांगितले. त्याच्याकडून मूठ असलेली, जुनी वापरती लोखंडी तलवार मिळून आली. या तलवारीची लांबी सुमारे ३३ इंच असून, तिची अंदाजे किंमत १,१०० रुपये आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष तलवार जप्त केली. त्यानंतर शेख अल्ताफ शेख रऊफ याच्याविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक फौजदार राजेश मेंढे, पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील, पोलीस हवालदार प्रशांत विरणारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण लोहार, प्रकाश कोळी, भरत बाविस्कर, समीर सैयद, पंकज सोनवणे आणि सागर बिडे यांचा समावेश होता.नशिराबाद परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button