
जळगाव लाईव्ह न्यूज । मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याचा राग मनात धरून सतत दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने आसोदा उड्डाणपुलाजवळ जीवनयात्रा संपविली. प्रशांत संजय सोनवणे (वय २८, रा. देऊळवाडा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सोनवणे याच्या मावस बहिणीचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधाला प्रशांतचा विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. या विरोधातून संदीप महाजन, त्याचा भाऊ विशाल आणि त्यांच्या आईकडून प्रशांतला धमकावणे, वाटेत अडवणे तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या कथित त्रासामुळे प्रशांत मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिराच्या मागील शेताच्या बांधावर तो मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी मृत प्रशांतच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून संदीप महाजन, विशाल महाजन आणि त्यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमकी कारणे, धमक्यांचे स्वरूप आणि संबंधित आरोपांची सत्यता याबाबत तालुका पोलीस तपास करत आहेत.





