जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । पोहण्यासाठी गेलेल्या शेळगावच्या तरुणाचा अंजाळे शिवारातील तापी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी घडली. अरूण उर्फ बालू शालीक कोळी (वय ३० वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत असे की, यावल तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीच्या पात्रात जळगाव तालुक्यातील शेळगाव येथील अरूण उर्फ बालू कोळी हा दुपारी साडेबाराच्या सुमारास पोहण्यासाठी नदी पात्रात उतरला. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
हा तरूण बराच वेळ तो बाहेर न आल्याचे अंजाळे येथील काही नागरीकांनी पाहीले. त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाण्याला ही माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले व शोध कार्यास सुरवात केली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या तरूणाचा मृतदेह शोधण्यास अखेर यश आले.
या तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात केल्यांनतर मयताचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून लक्ष्मन सपकाळे यांच्या खबरीवरून येथील पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.