जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । धरणगाव तालुक्यातील भोद बुद्रूक येथील ३० वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली असून यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
किशोर मोतीलाल पाटील (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी किशोर पाटील शेतातील मक्याला पाणी भरण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे मृत्यू झाला. ७ रोजी दुपारी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
दुपारपर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळला. ग्रामस्थांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन झाले. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.