जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । जळगाव शहरातील बी.जे. मार्केट परिसरात दुचाकी वॉशिंग करताना २० वर्षीय तौफिक अफजल भिस्ती या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
तौफिक हा शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहत होता. त्याचे वडील मिस्तरी काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. तौफिक हा लहानपणापासून बी.जे. मार्केट परिसरातील एका वॉशिंग सेंटरवर काम करुन वडीलांना हातभार लावित होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तौफिक हा आपल्या इतर तीन सहकार्यांसोबत नेहमीप्रमाणे दुचाकी वॉशिंग करीत होता. यावेळी त्याला विजेचा शॉक लागल्याने तो जमिनीवर कोळसला. त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकारी अनस, अबरार, यासीर यांच्यासह मालक आसिफ भिस्ती यांनी त्याला दुचाकीवरुन तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
तौफिकला रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. खानेता पठाण यांनी त्याला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांसह नातेवाईकांनी मनहेलावणारा आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.