⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

‘त्या’ बंडखोरांना शिवसेना देणार अधिकृत उमेदवारी : संजय सावंत

जळगाव लाईव्ह न्युज | ३० जून २०२२ । भारतीय जनता पक्षातून बंडखोरी करत शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी ज्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या नगरसेवकांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहील व येत्या काळात त्यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देण्यात येईल. अशी ग्वाही शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत दिली.

जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर येत्या काळात याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. त्या अनुषंगाने शिवसेनेचे मोठे होण्यासाठी संपर्कप्रमुख संजय सावंत हे जिल्ह्यात काम करत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी गुरुवारी सायंकाळी महानगरपालिकेमध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन व इतर नगरसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक शिवसेना पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शनिवारी निघणाऱ्या शिवसेनेच्या आक्रोश मोर्चा बाबतची रणनीती ठरवण्यात आली. या मोर्चात जळगाव शहर शिवसेना संपूर्ण ताकदीने उत्तर देणार असल्याची ग्वाही यावेळी नगरसेवकांनी संपर्कप्रमुख संजय सावंत यांना दिली. याचबरोबर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंबावर झालेले मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी आता शिवसेनेने एकत्र येऊन या आक्रोश मोर्चा द्वारे नागरिकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायला हवी असेही यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नगरसेवकांना सांगितले.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने शिवसैनिकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. अशावेळी शिवसैनिकांना आता खऱ्या शिवसेनेची जाण करून देण्यासाठी. या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे पूर्वनियोजित होते. हे उद्धव ठाकरे यांनी घडवून आणले आहे असे कित्येक शिवसैनिकांना वाटत असल्यामुळे त्यांच्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तर या मोर्चामुळे व सैनिकांना मिळणार असल्यामुळे आता शिवसेनेने एकजुटीने हा मोर्चा यशस्वी करायला हवा. असे सुर या बैठकीत ऐकायला मिळाले.