व्हॉट्सॲप सुरू करण्याच्या नादात बँक खाते रिकामे! जळगावच्या तरुण शेतकऱ्याला लाखो रुपयांचा गंडा

मे 23, 2026 12:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मोबाईलवर आलेल्या एका अज्ञात आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करणे जळगावातील एका तरुण शेतकऱ्याला भलतेच महागात पडले आहे. तांत्रिक अडचण आलेले व्हॉट्सॲप सुरू होईल या आशेने लिंकवर क्लिक करताच, सायबर भामट्यांनी बँक खात्याचा ताबा मिळवून तब्बल ६ लाख ८० हजार रुपयांचा ऑनलाईन डल्ला मारला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

नेमकी घटना काय?

कोल्हे नगर येथील रहिवासी असलेले अक्षय राजेंद्र पाटील (वय ३५) हे शेती व्यवसाय करतात. त्यांचे रिंगरोडवरील सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत ओव्हरड्राफ्ट (OD) खाते आहे. १६ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अक्षय यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनमध्ये काही तांत्रिक अडचण आल्याने ते उघडत नव्हते. नेमक्या याच वेळी त्यांच्या मोबाईलवर एक अज्ञात लिंक आली. ती लिंक व्हॉट्सॲपशी संबंधित असावी आणि त्याने अडचण दूर होईल, या आशेने त्यांनी त्यावर क्लिक केले.

लिंक उघडल्यानंतर सायबर भामट्यांच्या सूचनेनुसार त्यांनी दोन वेळा मोबाईल नंबर टाईप करून ‘Reconfirmation’ (पुष्टीकरण) दिले. यानंतर त्यांचे व्हॉट्सॲप तर सुरळीत सुरू झाले, मात्र त्यांच्या बँक खात्याचा ताबा सायबर चोरांकडे गेला. लिंकवर क्लिक केल्यानंतर काही वेळातच, म्हणजेच दुपारी ३:२८ ते रात्री १०:२० च्या दरम्यान अक्षय यांच्या मोबाईलवर सारस्वत बँकेकडून ओटीपी (OTP) आणि ‘मोबाईल बँकिंग ॲक्टिव्हेट’ झाल्याचे मेसेज येऊ लागले. संशयास्पद मेसेज आल्यानंतर त्यांनी तात्काळ बँकेचे मेसेज तपासले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सायबर भामट्यांनी आयएमपीएस (IMPS) आणि एनईएफटी (NEFT) द्वारे पहिल्यांदा ५ लाख रुपये, त्यानंतर ९० हजार आणि पुन्हा ९० हजार रुपये असे एकूण ६ लाख ८० हजार रुपये त्यांच्या संमतीशिवाय वेगवेगळ्या खात्यांवर वळवले होते.

तरुणाने दाखवली तत्परता, सायबर पोलिसात गुन्हा दाखल
खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे लक्षात येताच अक्षय पाटील यांनी वेळ न गमावता तत्काळ बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून आपले खाते ‘फ्रीज’ केले, ज्यामुळे पुढील आर्थिक नुकसान टळले. त्यानंतर त्यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनारायण देशमुख या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now