⁠ 
शनिवार, मे 4, 2024

नंदगाव येथे तरुण शेतकऱ्याची किटकनाशक पिऊन आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । एरंडोल येथून जवळपास चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदगाव येथील दिपक गोकुळ पाटील वय२२ वर्ष या तरुण शेतकऱ्याने कोसस्किल हे पिकांवर फवारणी करण्याचे विषारी द्रव्य सेवन करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना गुरुवारी पावणे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दीपक हा घरातला एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या कुटुंबात आई, वडील व दोन बहिणी आहेत. दीपक कला शाखेत द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. तो गुरुवारी शेतात फवारणी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याने फवारणी करण्याचे कीटकनाशक औषध सेवन केले. त्यावेळी त्याने मोराणे येथील त्याच्या मावस भावाला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला अशी माहिती त्यांचे चुलत भाऊ गणेश पाटील यांनी सांगितले. तसेच गणेश पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व दिपकला उपचारासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्राणज्योत विझली. या घटनेमुळे नांदगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक हा अविवाहित होता तर त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.