⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

यावलचे सुपुत्र डॉ.नितीन कुलकर्णी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य

जळगाव लाईव्ह न्यूज | १ जुलै २०२३|मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुरेश गोसावी आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रवींद्र कुलकर्णी या जळगाव जिल्ह्याच्या सुपूत्रांची नियुक्ती झाल्यानंतर आता देशातील सर्वात प्रतिष्ठीत महाविद्यालयांपैकी एक असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी यावलच्या सुपुत्राची नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.नितीन मधुकर कुलकर्णी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून सूत्रे स्वीकारली. हे कॉलेज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे. कॉलेजला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी परंपरा आहे. त्याचे प्राचार्यपद अनेक विद्वानांनी भूषवले आहे.

अभ्यासू, संयमी, सुशील आणि परिपक्व असलेल्या डॉ.कुलकर्णी यांनी प्रचंड कष्ट, प्रामाणिकपणा या गुणांनी हे शिखर गाठले. त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. यावल येथील तारकेश्‍वर विद्या मंदिर, सरस्वती विद्या मंदिरातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, जळगावच्या मू.जे.महाविद्यालयातून पदवी, पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण व पीएच. डी. आणि नंतर प्रसिद्ध अशा फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन असा विलक्षण प्रवास आहे. तेथेच उप प्राचार्य म्हणून जबाबदारी यशस्वपणे सांभाळली आहे. डॉ.नितीन कुलकर्णी नाशिक लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.

फर्ग्युसन कॉलेजबद्दल…

शिक्षणाचं माहेरघर असणार्‍या पुण्यामधील ऐतिहासिक वारसा लाभलेलं कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेज. फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली वामन शिवराम जोशी, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुढाकारातून झाली आहे. भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत फर्ग्युसनची गणना होते.

भारताचे माजी पंतप्रधान व्हीपी सिंग आणि पी. व्ही. नरसिंहराव, सुरेश कलमाडी, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनेक राजकारण्यांपासून पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, थोर सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल रामजी शिंदे, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, कै. स्मिता पाटील, सोनाली कुलकर्णी, पूजा बत्रा, दिग्दर्शक आणि अभिनेता गौतम जोगळेकर, अभिनेत्री सई परांजपे, वसंत कानेटकर या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. एक विशेष नावदेखील या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या यादीत आहे ते म्हणजे थोर स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर!