⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | कृषी | जागतिक कृषी पर्यटन दिन कधी व का साजरा केला जातो? हे माहित आहे का?

जागतिक कृषी पर्यटन दिन कधी व का साजरा केला जातो? हे माहित आहे का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील काँक्रिटच्या जंगलातील लोक निसर्गाचे सान्निध्य शोधत असतात. याच नावीन्याच्या शोधात असणार्‍यांना कृषी पर्यटन केंद्र उत्तम पर्याय म्हणून नावारुपास आले आहे. शेती, निसर्गरम्य वातावरण आणि ग्रामीण जीवन यातील एक वेगळा अनुभव घेण्याची संधी म्हणजे कृषी पर्यटन. शेती, ग्रामीण जीवन आणि पर्यटन यांचा समन्वय म्हणजे कृषी पर्यटन. ग्रामीण भागाशी नाळ तुटलेल्या शहरातील नागरिकांना कृषी पर्यटनाच्या रुपाने पुन्हा एकदा गावाकडचे जगणे अनुभवण्याची संधी मिळत आहे. शेती आणि ग्रामीण आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी कृषी पर्यटन हा एक चांगला पूरक व्यवसाय आहे. गावाकडच्या मोकळ्या वातावरणात शेतीतील कामे पाहणे, अनुभवणे आणि ग्रामीण संस्कृतीचा आस्वाद घेणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते. पर्यटकांचा ओढा याकडे दिवसेंदिवस वाढत असल्याने कृषी पर्यटनाचा उद्योग अनेक जिल्ह्यांमध्ये उद्योग क्षेत्र म्हणून उभा राहत आहे. १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.

ऑस्ट्रेलियात जन्म
कृषी पर्यटनाचा जन्म कुठे झाला? बाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जातात. मात्र साधारणपणे सुमारे ७० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये कृषी पर्यटन या संकल्पनेची व्यावसायिक पातळीवर सुरुवात झाली असे मानले जाते. ऑस्ट्रेलियासह ब्राझील, न्यूझीलंड, कॅनडा, इटली या देशांमध्येही कृषी पर्यटन पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात होते. युरोपीय देशांनी तर कृषी पर्यटनाला चालना देऊन त्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यताही दिली आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये या क्षेत्राला एका उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.

भारतात महाराष्ट्राने सर्वात आधी केली सुरुवात
भारतात कृषी पर्यटनाची सुरुवात करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम बारामतीतील प्रगतशील शेतकरी स्व.आप्पासाहेब पवार यांचा यात खूप मोठा वाटा आहे. मात्र त्याला व्यावसायिक स्वरुप देवून राज्यात कृषी पर्यटन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय चंद्रशेखर भडसावळे यांना जाते. चंद्रशेखर भडसावळे यांनी कृषीविषयक शिक्षण घेऊन १९८५ साली कृषी पर्यटन केंद्राच्या धर्तीवर सगुना बागेची स्थापना केली. भातशेती शेततळ्यांमधील मत्स्यपालन, नारळ, आंबा, चिकूसारखी फळपिके आणि शेतीविषयक विविध भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली. त्यानंतर त्याला अ‍ॅग्रो टुरिझमचे स्वरुप दिले. आता ही संकल्पना सर्वत्र रुजली आहे. सध्यस्थितीत महाराष्ट्रात ३५० पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र कार्यरत आहेत. आणि आज महाराष्ट्राच्या २९ जिल्ह्यांमध्ये ही विस्तारलेली कृषी आणि ग्रामीण पर्यटन चळवळ ५२८ कृषी पर्यटन केंद्रापर्यंत गेली आहे. महाराष्ट्रात एकूण कृषी पर्यटन केंद्रावर ती ४,१६७ विदेशी पर्यटकांनी भेट दिलेली आहे. छोट्यातला छोटा शेतकरी असेल किंवा मोठ्यातला मोठा कृषी विद्यापीठ असेल या सर्वांना आता कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्र सुरू करता येऊ शकतात.

विकेंड टुरिझमचा नवा फंडा
कृषी पर्यटन केंद्रावर संपूर्ण नैसर्गिक वातावरण, चुलीवरचे जेवण, जेवणात शेतातील भाजीपाला, बैलगाडीवरती रपेट, शिवार फेरी इत्यादी आनंददायी गोष्टींचा समावेश असतो. शिवार फेरीमध्ये शेतकरी आपल्या शेतावरील पिकांची, विविध वनस्पतींची माहिती पर्यटकांना देत असतो. तसेच पर्यटक हातात नांगर धरून शेतीची नांगरणी, कुळवणी, भात लावणी ते काढणी अशा निरनिराळ्या शेतीकामात सहभाग घेऊन स्वत: आनंद घेत असतात. अलीकडच्या काही दिवसांमध्ये फेसबूक, इन्स्ट्राग्राम, ट्विटरसारख्या अन्य सोशल मीडिया साईट्सवर शेतात काम करणार्‍या तरुण-तरुणींचे फोटो पहायला मिळत आहेत. हे केवळ अ‍ॅग्रो टुरिझममुळेच शक्य झाले आहे. शेतावर मुक्काम करून पर्यटक निसर्गाचा अनुभव घेतात. यासाठी ग्रामीण भागातील शैलीची कौलारु घरे, मातीच्या भिंती अशा घरांची निर्मिती केलेली असते. विकेंड टूर म्हणून याला मोठी पसंती मिळतांना दिसत आहे.

कृषी पर्यटनातून आर्थिक विकास
कृषी पर्यटनामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला मोठी चालना मिळू शकते. अनेक ठिकाणी हे सिध्द देखील झाले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍याला ठराविक कालावधीतच उत्पन्न मिळते, ते देखील निसर्ग व बाजारपेठेच्या मर्जीवर अवलंबून असते. यामुळे कृषी पर्यटन हा नियमित उत्पन्न देणारा मार्ग आहे. अनेक शेतकरी शेतीतून उत्पादित झालेला सेंद्रिय शेतमाल जागेवरच थेट पर्यटकांना विकून उत्पन्न मिळवत आहेत. याशिवाय ग्रामीण लोककला शहरात पोचवण्याचे हे माध्यम असून गावातच रोजगार मिळवून देण्याचे मुख्य साधन देखील झाले आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतमाल विक्रीची थेट बाजारपेठ निर्माण करणे शक्य आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.