⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

फ्लाईंग ट्रेंनिंग अकॅडमीचे काम सप्टेंबरपासून सुरू होणार : खा.उन्मेष पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२१ । केंद्र शासनाच्या विचाराधीन असलेल्या फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले होते. तसेच केंद्रीय नागरी उड्डायन मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन चर्चा करून जळगाव विमानतळाचा समावेश करण्याची विनंती केली होती. आजवर केलेल्या पाठपुरव्याला यश आले असून जळगावला फ्लाईंग अकॅडमीचे काम सप्टेंबरपासून प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे खा.उन्मेष पाटील यांनी जळगाव ‘लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.

खा.उन्मेष पाटील म्हणाले की, नवी दिल्ली येथील स्कायनेट ऐरीओ प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या संदर्भातील मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. संस्थेला बीबीओएफटी या तत्वावर ही मान्यता देण्यात आलेली आहे. ५ हजार स्क्वे.मीटर जागा दिल्यानंतर सप्टेंबरपासून कामाला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हीएशन मंत्रालयाद्वारे देशात आणि देशाच्या बाहेर एकंदरीत असलेली वैमानिकांची गरज आणि मागणी लक्षात घेता आपल्या देशात या संदर्भातील मोठे काम उभे राहण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती.

त्यात राज्यातील एकमेव जळगावचा समावेश झाल्याने आपल्याला आनंदाची बाब आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना देखील जलद गतीने सर्व निविदा प्रक्रिया राबवून आज या संस्थेला मान्यता पत्र देण्यात आल्याने जळगावच्या केंद्राचा शेवटचा टप्पा झाला असून लवकरच प्रत्यक्षात उभारणीला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विमान प्राधिकरणाने रॉयल्टीमुक्त विमानतळ दिल्याने सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वैमानिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्राने पाऊल टाकले आहे. जळगाव विमानतळावर असलेल्या अधिकच्या जागेवर आदरातिथ्य सुविधा, हॉटेल, रिसॉर्टसोबत फळ, कृषीमाल केंद्र सुरू करण्याच्या प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डायन मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असून लवकरच त्याला मान्यता मिळेल असेही खा.उन्मेष पाटील यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.