⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

महिलादिन विशेष : डॉ. केतकी पाटील

माझी मुलगी माझा अभिमान

जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी
तशी नाजुक, देखणी लेक माझी सोनसळी

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । माझी मुलगी डॉ. केतकी हिच्यासाठी या कवितेच्या ओळी तंतोतंत लागू होतात. डॉ. केतकी हिचा जन्म ९ ऑगस्ट १९८८ रोजी जळगाव येथे झाला. पहिली बेटी धनाची पेटी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. लक्ष्मीच्या पावलांनी आलेली केतकी ही आमच्या परिवारात सुगंधाप्रमाणे दरवळू लागली.

लहानपणापासूनच केतकीचा स्वभाव हा जिद्द अन् चिकाटी असलेला राहीला आहे. मी आणि सौ. वर्षा दोघे डॉक्टर असल्याने स्वाभाविकपणे केतकीला देखील वैद्यकीय क्षेत्राचे आकर्षण होतेच. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून केतकीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर केतकीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाची धुरा सांभाळायला सुरूवात केली. हे आव्हान स्वीकारत असताना केतकीचा मलकापूर येथील हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्याशी विवाह झाला. आई-वडीलांप्रमाणे प्रेम देणारे सासर लाभल्याने केतकीचा संसार फुलू लागला.

मध्यंतरी कोरोनाच्या दोन लाटा आल्या. जळगाव जिल्ह्यात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देणारे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय हे एकमेव असल्याने या रूग्णालयाचा समाजाला उपयोग व्हावा या उद्देशाने डॉ. केतकी आणि डॉ. वैभव पाटील यांनी फ्रंट वॉरीयर म्हणून सूत्रे स्विकारली. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णालयाची टिम स्वतंत्रपणे नेमण्यात आली. तो काळ मोठा जिकरीचा होता. अनेक जण जीव मुठीत धरून होते. रूग्णालयात दाखल होणार्‍या रूग्णापासून ते त्यांच्या नातेवाईकांपर्यंत यांना मानसिक आधार देण्याची मोलाची कामगिरी डॉ. केतकी हिने सांभाळली. हे मी गर्वाने सांगेल. स्वत:ची तान्हुली मुलगी घरी सोडून डॉ. केतकी दिवसरात्र कोविड रूग्णांच्या सेवेत होती. मुलगी, सून, आई आणि डॉक्टर या ह्या जबाबदार्‍या केतकीने समर्थपणे पेलल्याचा मला अभिमान आहे. दिवसरात्र केलेल्या वैद्यकीय परिश्रमामुळेच आज हजारो रूग्णांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य आहे. आज जागतिक महिला दिन आहे. या दिनानिमित्त डॉ. केतकीला मंगलमय शुभेच्छा !

(डॉ. उल्हास पाटील, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group