⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महिलादिन विशेष : नर्मदाबाई, सरस्वताबाई, सौ. संगीता, जान्हवी आणि रूद्रा

शिक्षणाची संधी कुटुंबातील चार पिढ्यांच्या महिलांमुळे !

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । मी स्थापत्य अभियंता असून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेतले आहे. अभियांत्रिकी शिक्षणानंतर स्थापत्य बांधकाम प्रकल्पांसाठी सल्लागार व सेवा पुरवठादार म्हणून कन्सल्टन्सीचे काम करीत आहे. मला शिक्षणाची संधी मिळवून देण्यात आमच्या कुटुंबातील चार पिढ्यांचा महिलांचे योगदान आहे. त्यामुळेच मी पुढे जाऊ शकलो व स्वतंत्र उभा राहिलो.

शिक्षणाची संधी मिळवून देण्याचा पहिला मान आमची आजी नर्मदाबाई उर्फ नर्मदा बोय यांचाच. आम्ही नंदीचे खेडगाव येथील मूळ रहिवासी. तेथे आमची थोडी फार शेती होती. आजोबांचे फार लवकर निधन झाले. कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आजीवर आली. परंतु परिस्थिती आणि जबाबदारीने आजीला उत्तम प्रशासक व्हायला भाग पाडले. आजीने ग्रामीण समाज व्यवस्थेत सर्व कुटुंबाचा समर्थपणे सांभाळ व संगोपन केले. आजही गावातील बारा बलुतेदार समाजातील ज्येष्ठ मंडळी आजीने केलेल्या कष्टाची त्यागाची व वेळोवेळी गावातील गोरगरिबांना केलेल्या मदतीची आवर्जून आठवण करून देतात. आम्हास आमच्या आजीचा सार्थ अभिमान आहे.

त्यानंतर जबाबदारी आली ती माझी आई सौ. सरस्वताबाईवर. स्वर्गीय आजीने घालून दिलेल्या तत्व व नियमानुसार घरातील ज्येष्ठ सून म्हणून आईने कुटुंबातील सर्व काका आत्या व मावशींच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळली. या बरोबर सुट्टीच्या काळात गावी शेतीची जबाबदारी खंबीरपणे हाताळली. कुटुंबातील सर्व मुलांना शिक्षणासाठी पाचोरा येथे छोट्याशा भाड्याच्या घरात पाठवले. तेथे एकूण पंचवीस जणांना शिक्षणासाठी सांभाळले. शिक्षणानंतर नोकरी लग्न कार्य याची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. आईने घेतलेल्या अपार कष्टामुळे आम्ही सर्व भावंडे चांगले शिक्षण घेऊन शहरांमध्ये आज स्थिरस्थावर झालो आहोत. माझा एक आतेभाऊ आईस कुटुंबाची हेडमास्तर म्हणायचा. आमच्या कुटुंबातील कोणाचाही कौटुंबिक प्रश्न वा वाद असल्यास तो सोडवण्यासाठी आईच्या कोर्टातच आजही येतो. आई संबंधिताला योग्य न्याय देते. खरे तर आई केवळ पहिलीच्या वर्गात शिकलेली. पण ती सुद्धा उत्तम प्रशासक, समाजसेवक व सर्वांना योग्य न्याय देणारी प्रमुख आहे. आई आता नातवंडांसोबत भारतातच नव्हे तर स्वित्झर्लंडमध्ये सुनेसोबत आनंदाने राहते. याचा आम्हा सर्व कुटुंबास अभिमान आहे.

तिसरी जबाबदार महिला म्हणूध माझी अर्धांगिनी सौ. संगीता यांचा उल्लेख महत्त्वाचा. आमचे छोटे कुटुंब त्यांनीच सांभाळले आहे. सौ. संगीता यांचे शिक्षण बीकॉम, एलएलबी झालेले आहे. त्यांनी विधी सेवा देणे टाळले. पूर्णतः गृहिणी म्हणून परिवाराची जबाबदारी समर्थपणे स्वीकारली. आमच्या कुटुंबात आम्ही उभयतांसह दोन परी आहेत. मोठी जान्हवी उर्फ जानू व छोटी रुद्रा उर्फ माऊ. जान्हवीने नर्सरी ते आयआयटी रूरकी ते ड्यूक युनिव्हर्सिटी (अमेरिका) येथील सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश मेरीटने मिळवले. शिक्षणही नियोजित वेळेत पूर्ण केले. आता ती अमेरिकेत नोकरी करीत असून मास्टर डिग्रीसाठी जगातील टॉप थ्री विद्यापीठात प्रवेशाचे प्रयत्न करते आहे. रुद्रा पुण्यातील एमआयटी कॉलेज मध्ये कम्प्यूटर सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. तिलाही पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत जायचे आहे.

माझ्या प्रोफेश्नल व्यस्ततेच्या कार्यात दोन्ही मुलींच्या शिक्षणाकडे सौ. संगीताने जाणीवपूर्वक लक्ष दिले असून अपार कष्ट केले आहेत. तिने वेळोवेळी कुटुंबासाठी केलेल्या त्यागामुळे मी व माझे कुटुंब सामाजिक व प्रतिष्ठेची निश्चित अशी उंची गाठू शकलो. यात आमच्या चारही पिढ्यांमधील कर्त्या सवर्त्या महिलांचे मोठे योगदान आहे. माझ्या कुटुंबातील सर्व महिला, मुली, भगिनी व जगातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(प्रकाश पाटील, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group