जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेची तहकूब झालेली महासभा शुक्रवारी पार पडली. यावेळी सुरुवातीला काही गोंधळ झाला मात्र त्यानंतर महासभा अतिशय शांतपणे पार पडली. महासभेच्या पटलावर विविध विकास कामांचे ठराव मंजूर करण्यात आले मात्र यावेळी काही महिला नगरसेवकांनी पुढाकार घेत जळगाव शहरात होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात आवाज उचलला.
यावेळी नगरसेविका सरिता नेरकर, नगरसेविका दीपमाला काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमणांबाबत जाब विचारला. नगरसेविका सरिता नेरकर यांनी मोठ्या प्रमाणावर फुले मार्केटमध्ये होत असलेल्या अतिक्रमणाबाबत जाब विचारला. यावेळी अतिक्रमण विभागाने आम्ही दोनदा कारवाई केली व येत्या सोमवारपासून पुन्हा कारवाई सुरू करू असे स्पष्टीकरण दिले.
यावर बोलताना सरिता नेरकर यांनी प्रश्न उपस्थित करत तुमचा अतिक्रमण धारकांवर वचक नाही का? त्यांना तुमची भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला यावर आम्ही लवकरच कारवाई करू असे अतिक्रमण विभागातर्फे सांगण्यात आले. तर दुसरीकडे नगरसेविका दीपमाला काळे यांनी देखील शिवकॉलनी रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाची नोंद घेत ते देखील लवकरात लवकर हटवण्यात यावे अशी मागणी केली.