जळगाव लाईव्ह न्यूज । देशभरात फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या असून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच जळगावच्या रावेर तालुक्यातील फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात अजनाड येथील एका महिलेने गावातीलच अनेक महिलांच्या नावावर बोगस बचत गट स्थापन करून सरकारी आणि खाजगी बँकांमधून तब्बल ६० ते ६५ लाख रुपयांचे कर्ज उचलून त्यांची फसवणूक केली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील अजनाड गावात राहणाऱ्या एका महिलेने गावातीलच महिलांशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आणि आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून तिने अनेक महिलांकडून त्यांचे आधार कार्ड, फोटो आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांच्या आधारे तिने महिलांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे बनावट महिला बचत गट तयार केले.

या बोगस गटांच्या नावावर तिने विविध सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केले. बँकांच्या अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करून तिने तब्बल ६० ते ६५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून ती फरार झाली. काही महिन्यांनंतर, ज्या महिलांच्या नावे कर्ज घेण्यात आले होते, त्यांच्या घरी बँकांचे वसुली अधिकारी कर्जाच्या हप्त्यांसाठी येऊ लागले. आपण कोणतेही कर्ज घेतले नसताना आपल्या घरी वसुलीसाठी माणसे का येत आहेत, हे पाहून महिलांना धक्काच बसला.
त्यांनी चौकशी केली असता, आपल्या नावावर बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे कर्ज उचलल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलांनी एकत्र येऊन रावेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.याप्रकरणी प्रतिभा राजेंद्र पाटील राहणार अजनाड तिने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात रूपाली मुकेश तायडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.












