महिलेचे पोलिसाने वाचवले प्राण, पोलिस अधीक्षकांनी प्रशंसापत्र देऊन केला गाैरव!
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना रुळाजवळ पडलेल्या महिलेस ओढून बाहेर काढत तिचे प्राण एका पोलिसाने वाचवले. जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी दिनेश विश्वनाथ बडगुजर यांनी महिलेचे प्राण वाचवले आहे. ही घटना १५ राेजी सायंकाळी ७.३० वाजता प्लॅटफाॅर्म क्रमांक दोनवर घडली.
१५ रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेस प्लॅटफाॅर्म क्रमांक दोनवर आल्यानंतर सुनीता पांडुरंग बेडीस (वय ५२, रा. चाळीसगाव) ह्या पतीसह रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होत्या. गाडीचा वेग वाढल्यामुळे सुनीता यांना चढता न आल्याने त्या पाय घसरून त्या थेट रुळाकडे कोसळल्या. प्लॅटफाॅर्मवर हजर असलेल्या बडगुजर यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सुनीता यांना ओढून बाहेर काढले. सेकंदाचाही उशीर झाला असता तर अप्रिय घटना घडली असती.
अधीक्षकांनी प्रशंसापत्र देऊन केला गाैरव
बडगुजर यांनी महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक कुमार चिंथा, उपअधीक्षक (गृह) विठ्ठल ससे यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरव केला.