⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | जळगावात ३० लाखाच्या लालसापोटी निवृत्त परिचारिकेची हत्या, झेडपीच्या दोघा लिपिकांना अटक

जळगावात ३० लाखाच्या लालसापोटी निवृत्त परिचारिकेची हत्या, झेडपीच्या दोघा लिपिकांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ३० लाख रुपयाच्या लालसापोटी निवृत्त परिचारिकेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्नेहलता अनंत चुंबळे (वय ६०) असं हत्या केलेल्या महिलेचे नाव असून याबाबत जळगाव जिल्‍हा परिषदेच्या दोन लिपिकांना अटक करण्यात आली आहे. जिजाबराव पाटील (वय ४८, रा. मुंदडानगर, अमळनेर) व विजय रंगराव निकम (वय ४६) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकी घटना काय?
स्नेहलता चुंबळे एप्रिल २०२३ मध्ये साळवा नांदेड (ता. धरणगाव) येथून निवृत्त झाल्या होत्या. १७ ऑगस्टला त्या मुलगा समीर याच्यासह नाशिकहून जळगावला आल्या होत्या. २० ऑगस्टला रात्री अकराच्या रेल्वेने त्या नाशिकला परत येणार असल्याचे पती संजय देशमुख यांना फोन करून सांगितले होते. मात्र, त्या पोहोचल्याच नाही.

मुलगा समीर, पती संजय यांनी २१ ऑगस्टला त्यांचा शोध घेतला. मात्र, माहिती मिळाली नाही. स्नेहलता यांनी नाशिकला प्लॉट घेण्यासाठी स्टेट बँकेतून ३० लाख रुपये काढले. त्यांच्यासोबत काम करणारा जिजाबराव पाटील असल्याची माहिती स्नेहलता यांची मुलगी मयुरी देशमुख हिला चांदसर येथील मामा सुनील शिंदे यांनी दिली. ही माहिती कुटुंबीयांनी दिल्याने गुन्हे शाखेने तपासाला गती दिली.

गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील व कर्मचाऱ्यांनी जिजाबराव पाटील व विजय रंगराव निकम यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता, सुरवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना रात्री अकराला अटक करण्यात आली. मृत स्नेहलता यांचा मुलगा समीर यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, स्नेहलता चुंबळे जळगावला ग. स.सोसायटीच्या बैठकीला आल्या असताना, जिजाबराव पाटील व विजय निकम यांची भेट झाली. प्लॉट घेण्यासाठी पैसे काढायचे असल्याचे सांगितल्याने जिजाबराव त्यांच्यासोबत गेला. पैसे काढून स्नेहलता यांना कारमध्ये घेऊन जात असताना, गळा आवळून खून करून मृतदेहाची अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.