⁠ 
शनिवार, मे 4, 2024

बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन जळगावातील डॉक्टर महिलेची पुण्यात आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । जळगाव येथील माहेर असलेल्या एका विवाहित डॉक्टर महिलेने बाराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे येथे घडली. डॉ. किरण संदीप पाटील (वय ३४, रा.विद्यानगर, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेचे नाव असून याबाबत पतीसह सासरच्या चार जणांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. किरण यांचे पती आयटी इंजिनिअर असून, मालमत्तेचा हक्क सोडावा व घटस्फोट द्यावा या कारणावरून डॉ. किरण यांचा पुनावळे येथे २०११ ते ७ जुलै २०२१ या कालावधीत सतत छळ झाला. डॉ. किरण यांनी माहेरी या घटनेची माहिती दिली होती. ७ जुलै रोजी पती, सासरच्यांनी जबरदस्तीने तिच्याकडून चिठ्ठी लिहून घेतली. आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये असे त्यात लिहिले आहे; पण हे अक्षर तिचे नाही व सहीदेखील तिची नाही, असे डॉ. किरण यांच्या आई विमल शिरीष लोखंडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यानुसार विवाहितेचा पती संदीप कांतीलाल पाटील (वय ४०), सासरे कांतीलाल झावरू पाटील (वय ५६), कमल कांतीलाल पाटील ( रा. पुनावळे, पिंपरी-चिंचवड, मूळ रा. साळवा, ता. धरणगाव) आणि नणंद मनीषा यशवंत पाटील ( अयोध्यानगर, जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलीला तिच्या वर्णावरून आरोपींनी वारंवार हिणवले. तसेच भागीदारीमध्ये घेतलेल्या घराच्या हक्क सोडपत्रावर सही करण्यास आणि जबरदस्तीने घटस्फोट देण्यासाठी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या विवाहित मुलीने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.