जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या रस्ते अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून याच दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला असून यात महिलेचा मृत्यू झाला तर लहान मुलगी आणि दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगर जवळ शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. शानुबाई राकेश बारेला (वय-३५) असं मयत महिलेचं नाव असून या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

या घटनेबाबत असे की, धरणगाव ते एरंडोल रस्त्यावरील अंबिका नगर येथे आज सायंकाळी ५ वाजता दोन दुचाक्या समोरासमोर धडकल्या. या भीषण अपघातात पहिल्या दुचाकीवरील किरण पुंडलीक मराठे (वय-३५, रा. बोरखेडा बुद्रुक) तर दुसऱ्या दुचाकीवरील राकेश दुपसिंग बारेला (वय-४५), शानुबाई राकेश बारेला आणि त्यांची कानबाई राकेश बारेली (वय-५, मुलगी रा.चाचपणी, दुधखेडा बलवाडी, मध्यप्रदेश) हे जखमी झाले होते.
यातील गंभीर जखमी झालेल्या महिलेवर धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना रूग्णवाहिकेने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहे. दरम्यान या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.