जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२२ । अन्याय, अत्याचार, दहशतवादसाठी नेहमी चर्चेत असलेल्या काश्मीरमध्ये सध्या एक वेगळेच वातावरण आहे. गेल्या २२ दिवसात ८ टार्गेट किलिंगच्या घटना काश्मीर खोऱ्यात घडल्या असून त्याद्वारे काश्मिरी पंडित आणि परप्रांतीयांच्या मनात भीती निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. तसेच इसीस ISIS संघटना शिया मुस्लिमांच्या विरोधात असून काश्मीर खोऱ्यात शिया अल्पसंख्य राहिले आहेत. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या प्रकारावर सध्या राजकारणी आणि लेखक जावेद बेग यांनी काही ट्विट केले असून ते जोरात चर्चेत आहेत. बेग यांनी एक ट्विट करून हिंदूंच्या शिवाय आपले नशीब गेल्या वेळेपेक्षाही अधिक खराब असेल, बाहेर या आणि आताच विरोध करा, असे त्यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीर खोऱ्यात गेल्या २२ दिवसांत ८ टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. सध्या सुरु कारवायांना मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच विरोध होत असून निदर्शने आणि आंदोलने होत आहेत. काश्मीरमधील आंदोलनात काश्मिरी पंडित, गैर काश्मिरी नागरिक, परप्रांतीय, लहान शाळकरी मुले हे सगळेच या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. काश्मिरी पंडित, काश्मीर खोरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याच्या प्रयत्नात आहेत, पण तेही यावेळी जाहीरपणे या घटनांचा निषेध करण्यासाठी सरसावले आहेत. शुक्रवारी राज्यभरात ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली आहेत.
राजकारणी आणि लेखक जावेद बेग यांनी फोटोसह केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे. काश्मिरातील माझ्या १५ लाख शिया मुस्लीम बंधू आणि भगिनींनो, श्रीनगरमध्ये ISIS कडून शिया मुस्लिमांच्या घरांबाहेर शिया काफिर अशा घोषणा मोठ्या अक्षरात लिहिण्यात आल्या आहेत, ही तीन आठवड्यांपूर्वीची घटना आहे, हे लक्षात ठेवा. हिंदूच्या शिवाय आपले नशीब गेल्यावेळेपेक्षाही अधिक खराब असेल. बाहेर या आणि आत्ताच विरोध करा, असे आवाहन जावेद बेग यांनी ट्विट करून केले आहे. १९९० सारखी परिस्थिती यावेळी उद्भवू देणार नाही. जम्मू काश्मीर परिसरात ४०० निमलष्करी दलाच्या अधिकच्या तुकड्या तैनात होतील. हिंदू अधिकाऱ्यांचे पोस्टिंग सुरक्षित ठिकाणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने उच्चसत्रीय बैठक याबाबत काही माहिती दिली आहे.
शुक्रवारच्या जुम्म्याच्या नमाजनंतर काश्मिरात अनेक ठिकाणी मौलवींनी अल्पसंख्याक समाजाच्या होत असलेल्या हत्यांची निंदा करत, त्याविरोधात आवाज उठवला आहे.इस्लाम अशा हत्यांना परवानगी देत नसल्याचे या मौलवींचे म्हणणे आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी काश्मिरातील धर्मनिरपेक्ष वातावरण खराब करणाऱ्यांचे समर्थन करणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. गैर काश्मिरींवर होत असलेल्या हल्ल्यांना शाळांतूनही विरोध होतो आहे. शाळांच्या प्रार्थनेच्यावेळी विरोधाची घोषणाबाजी होते आहे. शाळेतील मुले आणि कर्मचारी या घोषणा देतायेत. शिक्षक संघटनेकडून या हत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.