जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुचर्चित फडणवीस सरकारचा अखेर काल रविवारी नागपुरात पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.मात्र या मंत्र्यांना कोणतं खाते मिळणार हे गुलदस्त्यात आहेत.दरम्यान, आता महायुती विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करणार का याकडे साऱ्या महाराष्ट्रातील लक्ष राहणार आहे.
महायुतीने सत्ता स्थापित केल्यापासून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कधी होणार असा प्रश्नही शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय.यातच आज सोमवारपासून 16 डिसेंबर पासून राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरुवात झाली आहे. या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल का? याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान आता याच संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी जाहीर झाली होती. त्यामुळे या अधिवेशनातही कर्जमाफी होईल, अशी शेतकऱ्यांची अटकळ होती.
पण, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. म्हणून कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनातं होणार नाही, असे चित्र आहे. नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.