⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | विशेष | सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात

सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला. जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी या महाराष्ट्राने पाहिला आहे…सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात…तर जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही… असे अंगावर शहारे आणणारे डॉयलॉग असलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे आनंद दिघे नक्की कोण होते? त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

गरिबांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणार्‍यांवर जरब बसवणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. आपलं आयुष्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची करणारे दिघे यांना माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं.

आनंद दिघे याचं यांच पूर्ण नाव आनंद चिंतामणी दिघे. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात ते लहानाचे मोठे झाले. बाळासाहेब ठाकरेंचे वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झालेल्या दिघे यांनी ७०च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी स्वत:चं आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण केलं होतं. त्यांनी कुटुंबियांनाही लांब केलं. एवढेच काय तर त्यांनी शिवसेनेसाठी लग्न देखील केलं नाही. जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आल्यानंतर दिघेंनी कार्यालयात राहणं सुरू केलं. दिघे यांचे नाव राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त घेतलं जात होतं. आनंद दिघेंची लोकप्रियता जनसामान्यांमध्ये इतकी वाढली होती की, त्यांना ठाण्याचे बाळसाहेब ठाकरे म्हटलं जात होतं.

दिघे यांनी टेंभी नाका परिसरात ‘आनंद आश्रम’ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात ‘जनता दरबार’ भरायचा. येथे पहाटेपासून लोक त्यांच्या समस्या घेवून याचचे त्या ऐकून घेत त्या तात्काळ सोडविल्या जात. लहानसहान भांडणापासून ते घरातील कौटुंबिक तक्रारीपर्यंत अनेक विषय दिघेच्या जनता दरबारात यायचे. ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेनी अनेक प्रयत्न केले. ‘आनंद आश्रम’ आजही २० वर्षांपूर्वी जसा होता तसाच आहे. येथे आजही शेकडो लोक केवळ दर्शनासाठी येतात. आनंद दिघे ज्या खूर्चीवर बसायचे त्याची दररोज सफाई होते, त्यांच्या टेबलवर दररोज त्या दिवसाचे वृत्तपत्र ठेवलं जातं. अगदी आधी जसं व्हायचं तसचं आजही होतं. अनेकांना जणू असे भासते की, दिघे साहेब आताच येवून त्यांच्या खूर्चीवर बसतील व दरबार सुरु करतील!

शिवसेनेच्याच नगरसेवकाचा खुन केल्याचा आरोप

१९८९च्या ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीमुळे आनंद दिघे यांचे नाव ठाणेच्या सीमा ओलांडून राज्यभर प्रकाशझोतात आलं. याचं कारण म्हणजे, शिवसेनेचेच तत्कालिन नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्या खूनाप्रकरणी दिघे यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. याचं कारण म्हणजे, ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरपदासाठी प्रकाश परांजपे शिवसेनेचे उमेदवार होते आणि शिवसेनेचा महापौर निवडून येणं अपेक्षित होतं. आनंद दिघे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असल्यानं परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या निवडणुकीत शिवसेनेचीच काही मते फुटल्याने अवघ्या एका मताने परांजपे यांचा पराभव झाला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवामुळे बाळासाहेबदेखील प्रचंड संतापले होते. काही दिवसांनंतर शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी विरोधीपक्षाला मतदान केल्याची चर्चा सुरु झाली आणि त्याच काळात खोपकरांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. याप्रकरणी दिघे यांच्यावर आरोप झाले होते. हे प्रकरण राज्यभर गाजलं होतं.

दिघे यांचा अपघात आणि शिवसैनिकांनी जाळंलं सिंघानिया हॉस्पिटल

दिघे यांचा २५ ऑगस्ट रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. वंदना टॉकिजजवळील एसटी आगारातून बाहेर पडणार्‍या बसवर दिघे यांची जीप आदळली आणि त्यांच्या पायांना व डोक्याला दुखापत झाली. त्यांना तत्काळ सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिरावत होती. परंतु २६ ऑगस्टला संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. दिघे आपल्यातून गेले, असे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केले. आपला लाडका नेता आपल्याला कायमचा सोडून गेल्याचं दु:ख आणि त्यातून निर्माण झालेल्या बेधुंद अशा प्रक्षोभात संपूर्ण सिंघानिया हॉस्पीटल जाळण्यात आलं होतं

म्हणून आनंद दिघेंना ‘धर्मवीर’ म्हटलं जायचं

आनंद दिघे देवाधर्माबद्दल ते सजग होते. देवा-धर्माच्या बाबतीत दिघे अतिशय कडक धोरण अवलंबवायचे. दिघेंनीच टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव, पहिली दहीहंडी सुरू केली होती. न्यायनिवाड करणारे जणू ते समांतर न्यायालयच होते. त्यांच्या दरबारात अनेक लोक समस्या घेवून येत व समाधान घेवून जात. आताच्या राजकारण्यांसारख मी बघतो… मी करतो… अशी त्यांची कार्यपध्दती नव्हती. समस्या ऐकल्यानंतर ते लगेत समोरच्या फोन लावत किंवा थेट बोलवून घेत. त्यांनी केलेला न्यायनिवडा किंवा त्यांनी दिलेला आदेश हा अंतिम असायचा. सर्वसामान्यांसाठी झटणार्‍या या नेत्याला ‘धर्मवीर’ अशी पदवी सर्वसामान्यांनीच बहाल केली. त्यांची अफाट लोकप्रियता असली त्यांनी कोणतीही निवडणूक लढविली नाही किंवा जिल्हाप्रमुख पद वगळता कोणतेही पद घेतले नाही. आनंद दिघे आज लौकिक अर्थाने हयात नसले तरी सर्वसामान्यांच्या मनात ते आजही जिवंत आहेत.

आता सर्वांना ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ चित्रपटाची उत्सुकता

मुळशी पॅटर्न, देऊळ बंद यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी सरसेनापती हंबीरराव या चित्रपटानंतर प्रविण तरडे ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट घेवून येत आहेत. आनंद दिघे यांची दमदार व्यक्तिरेखा प्रसाद ओक हा अभिनेता साकारत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून या चित्रपटाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.