जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । राज्यात गेल्या महिन्याभरापासून हनुमान चालीसा पठणावरुन सुरु झालेला शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य वाद अद्यापही शमलेला नाही. कारागृहातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि ठाकरे सरकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी खा.नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका करीत वादात उडी घेतली आहे. ‘कोण नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना एवढं महत्त्व का द्यायचं?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करीत राणा दाम्पत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली होती. राणा यांच्या घोषणेनंतर राज्यात मोठे रणकंदन पेटले होते. राणा विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद पाहायला मिळत असताना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना अटीशर्थींसह जामीन मंजूर केल्यावर ते कारागृहाबाहेर आले होते. बाहेर आल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा ठाकरे सरकारला टार्गेट केले होते. त्यातच पुन्हा अकबरुद्दीन ओवैसी यांच्या औरंगजेबच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष केले.
ठाकरे विरुद्ध राणे वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उडी घेतली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या की, ‘कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीचा अपमान करतो हे कितपत योग्य आहे? कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्त्व द्यायची काहीच गरज नाही. माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी राणा दाम्पत्य असा प्रकार करत असतं, असा आराेपही त्यांनी केला. विद्या चव्हाण यांच्या टीकेनंतर नवनीत राणा शांत राहणार नसून त्या देखील प्रत्युत्तर देतील हे निश्चित आहे.