महाराष्ट्रराजकारण

देवळाली-भुसावळ पॅसेंजरबाबत खोटं कोण बोलतयं खासदार का रेल्वे प्रशासन?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । देवळाली-भुसावळ पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी व चाकरमने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून बंद झालेली सेवा पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रेल्वेने टप्प्याटप्प्याने अनेक सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. आता तर देशातील बंद असलेल्या सर्व पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्याचे आदेश देखील रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही देवळाली-भुसावळ पॅसेंजर सुरु होण्याची चिन्हे नाहीत.

गत दोन वर्षांपासून बंद असलेली देवळाली-भुसावळ पॅसेंजर सुरु करण्याची मागणी हजारो रेल्वे प्रवाशांकडून सातत्याने होत आहे. मात्र भुसावळ डीआरएम कार्यालयाचे एकच ठरलेले उत्तर म्हणजे, ही गाडी पुर्ववत सुरु करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला असून त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मान्यता मिळाल्यानंतर गाडी लगेच सुरु होईल. मात्र आता तर रेल्वे मंत्रालयानेच सर्व बंद असलेल्या गाड्या पुर्ववत करण्याचे आदेश दिल्यानंतर नव्याने मंजूरी कशासाठी? असा प्रश्‍न सर्वसामान्य रेल्वे प्रवाश्यांना पडत आहे.

१५ ऑगस्ट पर्यंत ही गाडी सुरु होईल, अशी चर्चा असली तरी भुसावळ विभागाकडून याबाबत कोणतीच ठोस माहिती देण्यात आलेली नाही. मुळात नाशिक ते भुसावळ दरम्यान प्रवास करणार्‍या ग्रामीण भागातील लाखों प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने ही गाडी अत्यंत महत्त्वाची आहे. याच गाडीने चाळीसगाव व पाचोरा शहरांसह तालुक्यातील हजारो विद्यार्थी, चाकरमने व सर्वसामान्य प्रवाशी दररोज ये-जा करतात. मात्र या गाडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

खासदारांचे दुर्लक्ष
याबाबत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांचे काही दिवसांपर्यंत म्हणणे होते की, केंद्र सरकारने परवानगी दिली आहे मात्र राज्य सरकारची (तत्कालीन महाविकास आघाडी सरकार) परवानगी नसल्याने गाडी सुरु करण्यास अडचणी येत आहेत. मात्र आता राज्यात भाजपा सत्तेत आली आहे. आता तुम्हाला कुणी अडविले आहे? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे. जळगाव जिल्ह्यातील दुसर्‍या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे या देखील आश्‍वासन देण्यापलीकडे काहीच करत नाहीत. यामुळे सर्व प्रवासी गाड्या सुरु झाल्यानंतरही ही गाडी सुरु झालेली नाही.

Related Articles

Back to top button