⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शहांच्या भेटीदरम्यान मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाला हवीय इतकी मंत्रीपदे

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं असून यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहे. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. दरम्यान, अनेक दिवस उलटूनही नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसून यात कुणाला किती मंत्रीपदे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांच्या भेटीत तब्बल 4 तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी राज्यातील मंत्रिमंडळ आणि खातेवाटप याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील अपक्ष आमदारांना आणि ठाकरे सरकारमधील सर्व मंत्र्यांना मंत्रिपदे देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत मंत्रिमंडळातील एकूण 43 मंत्र्यांपैकी शिंदे गटाने 10 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याची केली आहे. तर भाजपला 28 मंत्रिपदे देण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. गृहखातं फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र, त्याला अद्याप भाजपमधून कोणीही दुजोरा दिलेला नाही.

अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री 2 वाजेपर्यंत विविध राजकीय गोष्टीवर चर्चा झाली. तसेच यावेळी कायदेतज्ज्ञही उपस्थित होते. 11 जुलै ला कोर्टात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर देखील शिंदे- शहांमध्ये खलबते झाल्याची शक्यता आहे. तसेच एकूण खाते वाटप, कोणाला किती मंत्रीपदे याबाबत सविस्तर चर्चा झाली असेल.