जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यातील पोलीस प्रशासन दिवसेंदिवस अपडेट होत असले तरी खाकीचा धाक संपत असल्याचे चित्र जळगावात पाहायला मिळत आहे. नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक बी.जी.शेखर हे गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात वार्षिक तपासणीसाठी आले आहे. एक दशकापूर्वी ‘आयजी’ येणार याच शब्दाने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणत होते. प्रत्येक पोलीस ठाणे आणि कर्मचारी अलर्ट राहत असे. साहेबांचा दौरा केव्हा आपल्या पोलीस ठाण्याकडे वळेल आणि कोण तक्रार करायला येईल याचा भरवसा नसल्याने अगोदरच खबरदारी घेतली जात होती. यंदाचे चित्र मात्र वेगळे आहे. नाशिक परिक्षेत्राचे ‘आयजी’ कोण आणि त्यांचा दौरा काय? हेच अवैधधंदे चालकांना माहितीच नाही. साहेब जिल्ह्यात असले तरी अवैध धंदे बिनधास्त सुरु आहे, त्यामुळेच काय कि खाकीचा धाक हरवला असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोणे एके काळी? होय आज असेच म्हणायची वेळ आली आहे. आजच्या काही वर्षांपूर्वी पोलिसांचा प्रचंड दरारा होता. अलीकडच्या काळात पोलीस आणि सामान्य नागरिकांचे नाते मैत्रीपूर्ण होत असले तरी ते नाते अवैध धंदे चालकांशी अधिक घट्ट होत आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर झालेले १०० कोटी वसुलीचे आरोप, वाझे प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या पीडी बॉम्ब प्रकरणात पोलिसांबद्दल असलेला उल्लेख कुठेतरी खाकीची प्रतिमा डागाळतोय. खाकीकडे बघण्याची भीती कमी होत असली तरी भ्रष्टाचारी म्हणून पाहण्याचा कल सर्वसामान्यांचा वाढत आहे.
जळगाव जिल्ह्याची गोष्ट करायची तर पोलीस प्रशासनाच्या रचनेनुसार जळगाव जिल्हा विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या अधिपत्याखाली असतो. जळगाव जिल्ह्यातील पोलीस ठाणे आणि मुख्यालयाची किमान वर्षातून एकदा तपासणी होत असते. सर्व स्थानिक पोलीस ठाण्यात सहाय्यक अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक हे तपासणी करतात. तर विशेष पोलीस महानिरीक्षक एकदाच निवडक पोलीस ठाणे आणि मुख्यालयाची तपासणी करीत असतात. पूर्वी पोलीस महानिरीक्षक कुठे भेट देतील याचा काही नेम नव्हता, यंदा मात्र त्यांचा दौराच जाहीर झाल्याने सर्वांना त्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूर्वी दौरा माहिती नसला तरी अवैध धंदे चालकांमध्ये मोठी दहशत होती. यावर्षी तर महानिरीक्षक जळगावात असतानाही अवैध धंदे बिनधास्त सुरु आहेत.
अवैध धंदे चालकांची इतकी मजल कुठे कि ते पोलिसांच्या आदेशाबाहेर जाऊन काम करतील पण पोलीस दलाला लागलेली हफ्तेखोरीची कीड अवैध धंदे चालकांची मुजोरी वाढवते. शहरात आणि जिल्ह्यात सट्टा, पत्ता, जुगार, अवैध वाळू वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड वाहने, अवैध लाकूड वाहतूक, हॉटेलमध्ये चालणारे कुंटनखाने, गुटखा बिनधास्त सुरु आहे. चोरट्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून दुचाकी चोरी तर दररोज ठरलेलीच आहे. महानिरीक्षक जिल्ह्यात असताना देखील हे सर्व सुरु आहे यावर कुणाची मेहेरबानी आहे. काही ठिकाणी तर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अवैध धंदे आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांना जळगाव जिल्ह्याची चांगली माहिती असून त्यांनी स्वतःची सूत्रे वापरली तर मोठे घबाड बाहेर पडू शकते.
जिल्ह्यातील कासोदा येथील गांजा प्रकरण, उमर्टीहून येणारे गावठी कट्टे, यावल तालुक्यातील अफूची शेती याबाबत गोपनीय यंत्रणा आणि एलसीबीला माहिती नसेल यात नवल वाटते. जळगावातील अवैध धंदे आणि चोऱ्यामाऱ्यांची योग्य पद्धतीने सांगड घातली तर जिल्ह्यात गुन्हे रोखणे सहज शक्य आहे. स्थानिक पोलिसांच्या हाती जे लागत नाही ते महानिरीक्षकांचे पथक गेल्या काही महिन्यांपासून शोधून काढत आहे. पूर्वी महानिरीक्षकांच्या पथकाने जिल्ह्यात येऊन छापा टाकणे, मोठी कारवाई करणे हे स्थानिक पोलिसांचे अपयश समजले जात होते. सध्या तर ते एकदम हलक्यात घेतले जाते. डीआयजी म्हणजे कोण? असे अवैध धंदे चालक, मालक विचारू लागले आहे. जळगाव जिल्ह्याची गत सध्या अशी झालीय कि स्थानिक पोलीस, विशेषतः स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे आणि अवैध धंदे चालकांनी साटेलोटे करून घेतले आहे. एखाद्या माध्यमातून वृत्त प्रकाशित होताच ‘मी मारल्याचे नाटक करतो, तू लागल्याचे नाटक कर’ असा फंडा राबविला जातो. काही क्षणात परिस्थिती पुन्हा जैसे थे होते.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, प्रवीण साळुंखे असताना त्यांची प्रचंड दहशत होती. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पदाऐवजी गृह विभागाने पोलिस उप महानिरीक्षक पदाची निर्मिती करून येथे मुंबई गुन्हे शाखेचे अपर आयुक्त बी. जी. शेखर यांची नियुक्ती केली. उप महानिरीक्षक बी.जी.शेखर यांना नाशिकचा चांगला अभ्यास असून ते देखील याकडे लक्ष वेधतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एलसीबी, स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी, कर्मचारी यांच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती घेत मायक्रो नियोजन केल्यास अवैध धंदे चालक आणि गुन्हेगारांमध्ये खाकीचा हरवलेला तो दरारा पुन्हा येण्यास मदत होईल हे निश्चित.