जळगाव जिल्हा

दुध संघाच्या चौकशीचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? – आ. एकनाथराव खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । दुध संघात लोणी व दुधाच्या भुकटीच्या साठ्याच्या बॉक्सची जवळपास एक ते दीड कोटींच्या वस्तुची चोरी झाली आहे. मात्र चोरीचा गुन्हा दाखल करणे सोडून पोलीस दुध संघाच्या चौकशीसाठी वेगवेगळी माहिती मागत आहेत. चोरीचा तपास सोडून दुध संघाच्या चौकशीचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? असा सवाल करीत पोलीस प्रशासन सत्ताधार्‍यांचे बटीक झाल्याचा घणाघाती वार राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

जिल्हा दुध संघातील अपहार आणि चोरीच्या विषयावरून आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शनिवारी भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार खडसेंसह त्यांच्या परिवारावर आरोप केले. या आरोपांना आ. खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. आ. खडसे म्हणाले की, जिल्हा दुध संघात झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल न करता मागील पाच वर्षातील व्यवहाराची माहिती पोलीस प्रशासनाने मागविली आहे. मुळात दुध संघाची चौकशी करण्याचा अधिकार सहकार विभागाला असतांना पोलिसांकडून संघाची छळवणूक सुरू आहे. पोलीस अधीक्षक प्रचंड दबावाखाली असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांकडून ही चोरी दडपण्याचा प्रयत्न सुरू असून आरोपींना ते संरक्षण देत असल्याचेही आ. खडसे यांनी सांगितले.

मंगेश चव्हाण तडजोडी करणारा माणूस
जिल्हा दुध संघासंदर्भात माहिती गोळा करणारा मंगेश चव्हाण हा साधा सभासदही नाही. मग यांच्याकडे ही माहिती आली कुठून? त्यांनी माहितीची चोरी केली असल्याचा आरोप आ. खडसे यांनी केला. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी आधीही अनेक तक्रारी केल्या आणि नंतर तडजोडी केल्या. राज्यात सरकार त्यांचे आहे, त्यांच्यात हिंम्मत असेल तर विधानसभेत त्यांनी हे मुद्दे मांडावे असे आव्हानही आ. खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिले. मोटारींची दलाली करणारे एवढे श्रीमंत झालेच कसे? असा सवाल करीत त्यांनी टोलाही लगावला. मंगेश चव्हाण यांनी सुरूवातील आरटीओसंदर्भात तक्रारी केल्या. पुढे त्या तक्रारींचे काय झाले? सरकार त्यांचे असतांना कारवाई होत नाही. याचाच अर्थ यांची सरकारमध्ये पत नाही असा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात भाजपा वाढविण्यात माझे मोठे योगदान आहे. मंगेश चव्हाण हे आयते आमदार झाले असून त्यांचे जेवढे वय नाही तेवढी वर्षे माझी राजकारणात गेली आहे. त्यामुळे मंगेश चव्हाण दुध संघाला आणि माझ्या परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही आ. खडसे यांनी केला.

कुठल्याही चौकशीला तयार
जिल्हा दुध उत्पादक संघात रूपयाचाही गैरव्यवहार असेल तर संबंधितांना जेलमध्ये टाका असे मी स्वत: सांगेल. राज्यात सरकार तुमचे आहे. त्यामुळे कुठल्याही एजन्सीकडून चौकशी करा, प्रत्येक चौकशीला आम्ही तयार असल्याचे आमदार खडसे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस जिल्हा दुध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये उपस्थित होते.

Related Articles

Back to top button