⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

सावधान ! तुम्हीही तुमच्या मुलांना कफ सिरप देताय? आधी ही बातमी वाचाच.. WHO कडून अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । तुम्हीही तुमच्या मुलाला कफ सिरप देत असाल तर सावधान. कारण पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप प्यायल्याने 66 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने याबाबत इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या 4 कफ सिरपबाबत (Cough Syrup) अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केल्यानंतर दिल्लीतील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप भारतातील हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती. मात्र या कप सिरपमुळे गांबिया नावाच्या देशात 66 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या मुलांच्या मृत्यूचं कारण त्यांच्या कीडनीमध्ये झालेला बिघाड असल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप आल्यानंतर लहान मुलांना एक सिरप देण्यात आलं होतं. या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिरपमुळे गंभीर आजार किंवा मृत्यूचा धोका
या अलर्टमध्ये डब्ल्यूएचओने म्हटलंय की, हे सर्व सिरप असुरक्षित आहेत आणि त्यांच्या वापरामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांमध्ये. याच्या सेवनामध्ये ओटीपोटात दुखणं, उलट्या होणं, जुलाब, लघवी करण्यास समस्या, डोकेदुखी, बदललेली मानसिक स्थिती यांचा समावेश असू शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो.

दरम्यान, WHO या औषधांची फार्मास्युटिकल कंपनी आणि भारत सरकारच्या नियामक प्राधिकरणांसोबत यासाठी चौकशी करत आहे. आतापर्यंत चार खोकल्याची औषधे मृत्यूचे कारण असल्याचे समोर आले आहे. यासाठी जगातील इतर देशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ही कफ सिरप मुलांना देणं टाळा :
प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन (Promethazine Oral Solution)
कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup)
मकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup)
मॅग्रीम एन कॉल्ड सिपर (Magrip N Cold Syrup)