⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

दिवाळी सरली, रथोत्सव आला.. जळगावातील रस्त्यांच्या कामाला मुहूर्त मिळणार कधी?

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील रस्त्यांबद्दल आता न बोललेलेच बरे. जळगावकरांनी खड्ड्यांची आणि नसलेल्या रस्त्यांची सवय करून घेतली आहे. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी जवळपास ५०१ कोटी लागणार असून तत्पूर्वी मनपाला प्राप्त काही निधीतून रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली होती. काही रस्ते तयार देखील झाले मात्र पावसाळा आल्याने पुन्हा कामाला ब्रेक लागला. सध्या पावसाळा संपला असून दिवाळी देखील सरत आली. जळगाव जिल्ह्याचे ग्रामदैवत श्रीराम रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील जळगावकरांना रस्त्यांच्या मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

जळगाव शहराचे मोठे दुर्दैव असे कि आजवर शहराने कधीच गल्लोगल्ली सुसाट रस्ते पहिलेच नाही. जळगावातील रस्ते कधीतरी मुहूर्त निघतो आणि एखाद्या प्रभागातील एखादा रस्ता तयार होतो असे आहे. गल्लोबोळातलं सोडा मुख्य रस्ते देखील कधी चकचकीत झाल्याचे जळगावकरांना आठवत नाही. जळगाव शहर मनपातील राजकारण्यांची अनास्था, हेवेदावे आणि प्रशासनाची उदासीनता हीच शहराचा विकास मागे ठेवण्यास कारणीभूत आहे. कधी निधी आला तर नियोजन नाही आणि नियोजन झालेच तर प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही असे अनेकदा झालं आहे.

जळगाव शहरात गेल्या तीन वर्षापासून अमृत योजना आणि भूमिगत गटारीच्या कामाला सुरुवात झाली आहे. अमृत योजनेचा ५० टक्के भाग देखील पूर्ण झाला आहे. दोन्ही योजनांसाठी रस्ते खोदल्यामुळे जळगावकरांना रस्तेच शिल्लक राहिलेले नाही. काही ठिकाणी मक्तेदाराने डागडुजी केली मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मलमपट्टीच्या कामाने रस्त्यात माती आणि खडी अधिकच उभरून दिसू लागली. रस्त्यांच्या डागडुजीच्या नावाखाली दरवर्षी अर्थसंकल्पात लाखो, करोडोंची तरतूद करण्यात येते. रस्ते डागडुजी तर केले जातात मात्र अवघ्या काही दिवसात पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण होते.

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी पावसाळ्याच्या अगोदर सुरुवात झाली होती. शहरातील काही प्रमुख रस्ते तयार देखील करण्यात आले मात्र पावसाळा लागल्याने पुन्हा ते काम बंद पडले. नव्याने तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांवर काही ठिकाणी अवघ्या काही महिन्यात खड्डे देखील पडले आहेत. खड्डे पडण्यामागील कारणे वेगवेगळी असली तरी त्यामुळे जळगावकरांनाच त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय, सध्या पावसाळा संपला असून देखील कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. गेल्या आढावा बैठकीत आणि महासभेत देखील रस्त्यांच्या कामावरून मोठे काथ्याकूट झाले.

मनपा प्रशासन मक्तेदारांना सन्मानपूर्वक वागणूक देत नाही, मनपाकडून मक्तेदारांची अडवणूक केली जाते, बीले पास केली जात नाही अशा अनेक बाबींवर सभेत वादळी चर्चा झाली. जळगाव मनपा म्हणजे सध्या तरी केवळ चर्चेचेच ठिकाण होऊन बसले असून प्रत्यक्षात काहीही होत नाही. महासभेत तर वहन मार्गाचे काम सुरु न केल्यास सभागृहाला कुलूप लावण्याची तयारी तरुणांच्या एका गटाने केली होती मात्र अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने ते आंदोलन स्थगित झाले. महासभेत देखील काही नगरसेवकांनी याबाबत आवाज उठवला परंतु ते देखील शांत झाले.

शेकडो वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्रीराम मंदिराचा वहनोत्सव सुरु झाला असून श्रीराम रथोत्सव देखील लवकरच पार पडणार आहे. तत्पूर्वी त्या मार्गावरील रस्त्यांची डागडुजी आणि नवीन रस्ते तयार होणे आवश्यक होते मात्र सध्या तरी तसे कोणतेही चित्र पाहायला मिळत नाही. जळगावकरांचे भाग्य कधी उजळणार आणि कधी रस्ते होणार हे तर येणारा काळच सांगू शकणार आहे. २०२३ च्या सुरुवातीपूर्वी तरी मुख्य रस्ते नवीन तयार झालेले पाहायला मिळतील अशी अपेक्षा सध्या जळगावकर नागरिक करीत आहेत.