आमोदासह बामणोद, भालोद उपसा जलसिंचन योजनेचे पुनरुज्जीवन कधी होणार!
तत्कालीन आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांनी मंजूर केला होता निधी
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । यावल तालुक्यातील आमोदा उपसा जलसिंचन योजना गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. संस्थेच्या पंप हाऊस मधील मोटार, पाईप अनेक साहित्य चोरीला गेले आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तत्कालीन आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांनी आमोदा, भालोद , बामणोद या उपसा योजनांच्या पुनरुज्जीवनसाठी लागणाऱ्या मान्यता व ८० कोटींचा निधी २०१८ साली मंजूर करून आणला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव व कोविड-१९ मध्ये कोरोन मुळे त्यांचे झालेले निधन यानंतर कुणीही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आजपर्यंत या प्रकल्पाची कोणत्याही प्रकारची कामे सुरू झाले नाहीत. दरम्यान, या योजनेचे प्रत्यक्षात काम सुरू व व्हावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
आमोदा येथील उपसा सिंचन अगदी जुनी झाल्याने व अनेक वस्तू चोरी गेल्या आहेत त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमोदा, बामणोद, भालोद हा पट्टा केळी, ऊस आदी पिकांचे क्षेत्र म्हणून ओळखला जातो. परंतु, उन्हाळयात जमिनीची पातळी अगदी खाली गेल्यामुळे या पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्यातच उपसा योजना असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्व.हरिभाऊ जावळे आमदार असताना त्यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
त्यात आमोदा उपसा योजना (२७ कोटी ३९ लाख) भालोद उपसा योजना (२९ कोटी ५० लाख) व बामणोद उपसा योजनेसाठी (२१ कोटी ६३ लाख) निधींच्या अंदाजपत्रकांना मंजुरी दिली होती. परंतु एवढे असून सुद्धा आज पर्यंत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. जर या उपसा योजनांचे पुनरुज्जीवन लवकरात लवकर झाले तर एकूण २६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे परिसर सुजलाम सुफलाम होईल. मध्यतरी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या यावल तालुका अध्यक्ष चेतन चौधरी यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यावेळी त्यांना विभागाकडे मनुष्यबळ नाही अशा प्रकारचे उत्तर मिळाले होते. या योजनेचे प्रत्यक्षात काम सुरू व व्हावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.