⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पाणीटंचाईचं संकट समोर असताना मनपा प्रशासन वाया जाऊ देते पिण्याचे पाणी !

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | सध्या संपूर्ण जगावर अल निनो या उद्भवलेल्या नैसर्गिक परिस्थितीमुळे पाणीटंचाई होते की काय? याचं संकट उभ आहे. यामुळे सर्व स्तरावरून पाण्याची नासाडी करू नका! पाणी जपून वापरा! अशा प्रकारे संदेश दिले जात आहेत. मात्र जळगाव शहर महानगरपालिका या संदेशाला किराची टोपलि दाखवत पाणी कसं वाया जाईल याकडेच लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ओंकारेश्वर चौक हा जळगाव शहरातील महत्त्वाचा चौक आहे. या चौकात गेल्या एका महिन्यापासून रस्त्यावर गुडघा एवढं पाणी साचत आहे. हे पाणी दुकानांमध्ये जात आहे. कुठून तरी पाण्याचा झरा येत असल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची तक्रार नगरसेवक बंटी जोशी यांनी कित्येकदा केली आहे. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये त्यांनी आयुक्तांना याविषयी जाब देखील विचारला होता. मात्र मनपा प्रशासन अतिशय धीम्या गतीने काम करत असून याकडे दुर्लक्ष करत आहे. वाया जाणार पाणी थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाही.

याबाबत नगरसेवक बंटी जोशी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मी गेल्या महिन्याभरापासून यासाठी मागे लागलो आहे. हा झरा नक्की कुठून येतोय याचा शोध घेऊन तो बंद करावा अशी मी मागणी करतोय. मात्र महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते. महासभेमध्ये देखील मी हा प्रश्न मांडला होता आणि महासभेत प्रश्न मांडल्यावर तो मार्गी लागेल अशी माझी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात असं काहीही घडताना दिसत नाहीये.

एकीकडे जळगाव जिल्ह्यात कडाक्याचे ऊन आहे. कीत्येक तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आहे. कित्येक गावांमध्ये तर टॅंकरने पाणी पोहोचव लागत आहे. मात्र जळगाव शहरात पाणी आहे. ते नागरिकांना मिळत आहे. मात्र रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. अशी परिस्थिती पाहिला मिळत आहे. मनपा प्रशासन याकडे लवकरच लक्ष देईल आणि तो झरा जिथून कुठून येतोय त्याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा नागरिक व स्थानिक नगरसेवक बंटी जोशी करत आहेत.