जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । भारतातील करोडो मोबाईल युजर्सच्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या व्हॉट्सअॅपचे लवकरच मेगा अपडेट येणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर्स कार्यान्वित झाल्यानंतर एकाच वेळी ३२ सदस्यांचा ग्रुप कॉल घेण्यासाठी तब्बल २ जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करता येणार आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर्स भन्नाट राहणार असल्याची माहिती समोर येत असली तरी ते केव्हा येणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही.
व्हॉट्सअॅपने गुरुवारी जाहीर केल्यानुसार नवीन फिचर अपडेट झाल्यावर ३२ सदस्यांना ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये सहभागी होण्याची आणि दोन जीबीपर्यंतच्या फाइल्स शेअर करण्याची परवानगी देईल. याशिवाय व्हॉट्सअॅपने आणखी अनेक नवीन फिचर्स देण्याची घोषणा केली आहे. सध्या मोबाईल अॅप वापरून ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये फक्त आठ लोकांना जोडता येते. तसेच युजर्स एक जीबीपेक्षा जास्त फाइल इतर कोणत्याही युजर्सला शेअर करू शकत नव्हते.
इतकंच नव्हे तर सध्या ग्रुप ऍडमिनला फारसे अधिकार नसल्याने मर्यादा येतात मात्र नवीन फिचर आल्यावर व्हॉट्सअॅप चॅट ग्रुपच्या अॅडमिनला कधीही मेसेज डिलीट करण्याची परवानगी देईल. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, डिलीट केलेले चॅट ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला दिसणार नाही. बऱ्याचवेळा एखाद्या सदस्याकडून ग्रुपमध्ये चुकीचा संदेश शेअर केला जातो आणि नंतर त्यावरून वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन फिचर आल्यावर ऍडमिनचा बराच त्रास कमी होणार आहे.
मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही व्हॉट्सअॅपवरील ग्रुप्समध्ये फीडबॅक, मोठ्या फाइल शेअरिंग आणि मोठ्या ग्रुप कॉलसह नवीन वैशिष्ट्ये देत आहोत.” मात्र, व्हॉट्सअॅपमध्ये हे नवीन फिचर्स कधी जोडले जातील याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअॅपचे जगभरात २ अब्जाहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. एका अहवालानुसार, व्हॉट्सअॅपचे जगात सर्वाधिक युजर्स भारतात असून ज्यांची संख्या सुमारे ४८.७ कोटी आहे.