मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023

शेतकऱ्यांनो सावधान! ‘तेज’ चक्रीवादळ येतंय.. महाराष्ट्रवर काय परिणाम होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । देशातून परतीचा मान्सून परतल्यानंतर आता चक्रीवादळाचे संकट आले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाले असून या चक्रीवादळाचे नामकरण ‘तेज’ असे करण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम होणार? ही माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.

पुणे हवामान विभागाजे शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ २६ ऑक्टोबरनंतर पुढे ओमानच्या दिशने जाणार आहे. हे चक्रीवादळ दक्षिण पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर या चक्रीवादळचा कोणताच परिणाम होणार नाही, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र आज शनिवारी तयार होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात तेज हे चक्रीवादळ तयार होणार आहे. हे चक्रीवादळ तीव्र असणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणमजवळ हे वादळ धडकणार आहे. त्यानंतर ओडिशा आणि बांगालदेशच्या दिशेने जाईल. आंध्रप्रदेश आणि ओडिशाला तेज या चक्रीवादळाचा फटका बसणार आहे.

दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात परतीचा पावसाने काढता पाय घेताच तापमानाचा पाऱ्यात वाढ दिसून आली. यामुळे ‘ऑक्टोबर हिट’चा तडाकामुळे जळगावकर घामाघूम झाले होते. मात्र गेल्या चार दिवसात जळगावातील तापमानात सरासरी २ ने घसरले असून कमाल तापमान ३६ अंशावर स्थिरावले आहे. किमान तापमान घसरल्याने पहाटे गारवा वाढला आहे.