⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जे घरातील महिलांना न्याय देऊ शकले नाही ते आपल्याला काय न्याय देणार : खा.सुप्रिया सुळे

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । सुषमा स्वराज या देशातील मोठ्या महिला नेत्या आहे. पहिल्यांदा सरकार आले ते सुषमा स्वराज यांच्यामुळेच आले. सरकार आल्यावर त्यांनी साधे त्यांना मंत्रीच काय खासदार देखील केले नाही. जो स्वतःच्या घरातील महिलांवर अन्याय करतो तो तुमचा काय विचार करणार याचा विचार करायची वेळ आली आहे. नाथाभाऊंवर अन्याय झाला म्हणून तर ते तिकडे कंटाळले. देशात जे-जे वाईट होते ते यांच्याच काळात होते आहे. आपल्यावर शाहू, फुले, आंबेडकरांचे संस्कार आहेत. आपण जे करू ते सुसंस्कृतपणे करणार. इथे सुषमा स्वराज यांना न्याय मिळाला नाही आपल्याला कुठे न्याय मिळणार? असा सवाल खा.सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

महागाई आणि मोदी सरकार विरोधात जळगावात मंगळवारी राष्ट्रवादी काँगेसने भव्य आंदोलन केले होते. आंदोलनाला संबोधित करताना खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या. खा.सुळे म्हणाल्या, पेट्रोल, डिझेल भाववाढ झाल्याने लिंबाचे दर देखील महागले. २०१४ मध्ये गॅस सिलेंडरचे दर ३५० रुपये होते आज १ हजार रुपये आहे. तेव्हा मोदी म्हणायचे बहोत हो गयी महंगाई कि मार, अबकी बार मोदी सरकार. आज मी मोदींना विचारते बहोत हो गयी महंगाई कि मार, बस करो मोदी सरकार. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे महागाई वाढली असे ते सांगतात. त्याचा आणि आपल्या देशाचा काय संबंध? इथे आमचे आधारकार्डचे वांधे आहेत आम्ही कुठे युक्रेनला जाणार? आमचे सरकार होते तेव्हा सुषमा स्वराज आम्हाला बोलत होत्या. जेव्हा भूक लागते तेव्हा युक्रेन आम्हाला दिसत नाही. हेलिकॉप्टर, नेत्यांना सर्वसामान्य लोकांचे दुःख काय कळणार? जानेवारीत हिजाब काढला, फेब्रुवारीत काश्मीर फाईल्स काढले, मार्चमध्ये भोंगे काढले, एप्रिलमध्ये हनुमान चाळीस काढली, मेमध्ये काय काढले तर ताजमहाल काढला, जूनमध्ये काय तर ज्ञानव्यापी काढले, नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे हे सर्व प्रयत्न आहे.

खा.सुळे यांनी सांगितले, आम्हाला सबसिडीची गरज नाही, आरक्षणाची गरज नाही. उज्ज्वला योजनेत १ कोटी महिलांना पहिल्यांदा सिलेंडर मिळाले नंतर पुन्हा कधी मिळाले नाही. तुम्ही कोणत्याही गावात जाऊन विचार तुम्ही सिलेंडर वापराता कि सरपण आणतात, असे जाऊन आज विचारा. पेट्रोल पंपावर मोठमोठे पोस्टर लावले, पुढे काहीच झाले नाही. कोविड काळात शेतकऱ्याने सर्वात जास्त कष्ट केले आहे. शेतकऱ्यांना एकही दिवस लॉकडाऊन नव्हता. आमच्या नेत्यांनी लॉकडाऊनमध्ये काम केले. शेतकऱ्यांचे कष्ट असल्यानेच कुणीही उपाशी मेले नाही. आज शेतकरी भरडला जात आहे. शेतकऱ्यांनी जर निर्धार केला तर कुणीच टिकू शकत नाही हे केंद्राने लक्षात ठेवावे, असे खा.सुळे म्हणाल्या.

खा.सुप्रिया सुळे यांनी, केंद्र सरकार आपले मायबाप आहे. देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना बोलावून पंतप्रधानांनी बैठक घ्यायला हवी, असे सांगितले. तसेच भाजपच्या एका नेत्याने एका महिलेवर हात उगारला. शाहू, फुले, छत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे, हि आपली संस्कृती आहे का? यापुढे जर असा कुठेही प्रकार झाला तर मी पुढे येऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. काल महिलेवर हात उगारला पण यापुढं नको. आम्ही खूप सहनशील आहोत पण काल अति झाले. आमचा पक्ष महिलांचा खूप मानसन्मान करतो असे सांगतात, हाच का मानसन्मान आहे. बेटी बचाव, बेटी पढाव हेच का तुमचे धोरण? हि प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. कायद्याने आपण न्याय मागणार आहोत. जोपर्यंत त्या तिघांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. लाज वाटायला हवी त्या पक्षाला. भाजप जर असेच महिलांच्या विरोधात करीत राहिले तर त्यांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता खा.सुळे म्हणाल्या कि, आजकाल लोक हिंदीत भाषण करू लागले आहे. मराठीचा तर त्यांना विसर पडला आहे. हिंदीत भाषण करा पण आमच्या माय मराठीवर अन्याय करू नका. मराठी हि आपली माय आहे. जो आपल्या आईला न्याय देऊ शकत नाही तो इतरांना काय न्याय देणार? असा सवाल उपस्थित करीत खा.सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला. तसेच जोपर्यंत सिलेंडरचा भाव कमी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करीत राहणार, असे त्यांनी सांगितले.

पहा व्हिडीओ प्रक्षेपण :