जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । मागील काही दिवसापासून राज्यात लाऊडस्पीकर नंतर हनुमान चालीसा प्रकरणावरून यापूर्वी बरेच राजकारण झाले आहे. आता अशात राजकीय पुढाकारांच्या अयोध्येच्या दौऱ्यावरून राज्यात राजकारण पेटू शकते. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अयोध्येत या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आलीय. राज ठाकरे यांचे नाव न घेता शिवसेनेने पोस्टरबाजी करत निशाणा साधला आहे. ‘असली आ रहे हैं नकली से सावधान’ जय श्री राम, अशा प्रकारचे पोस्टर अयोध्येत झळकत आहे.
दरम्यान, अयोध्येत किंवा उत्तर प्रदेशात असली नकली बॅनर कुणी लावले माहिती नाही. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आमची तारीख १० जून ठरतेय,असं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे १० तारखेला अयोध्येला जाणार आहेत. आदित्य टाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.