⁠ 
शनिवार, मे 4, 2024

भर पावसाळ्यात पारा 36 अंशांवर ; जळगावकर उकाड्याने हैराण, या तारखेनंतर पावसाचा अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । राज्यात पावसाने गेल्या महिन्यापासून विश्रांती घेतली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके करपू लागली आहे. तसेच नद्या, नाल्यांना अद्याप पूर आलेले नाहीत. धरणेही अपेक्षेनुसार भरलेली नाहीत. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. भर पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा 36 अंशांवर गेला आहे.

ऐन श्रावणात ऑक्टोबर हिटचा त्रास सहन करावा लागत आहे. श्रावण महिन्यात ज्या ठिकाणी श्रावणधारांची गरज असताना जळगावकर मात्र घामाच्या धारांनी त्रस्त झाला आहे. दरम्यान, ६ सप्टेंबरनंतर तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अशी माहिती अभ्यासक यांनी दिली.

राज्यासह जळगाव जिल्ह्यात जून आणि ऑगस्टमहिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र गेल्या महिन्याभरापासून पाऊस दडी मारून बसला आहे.

पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या हंगामातील पिकांची अवस्था बिकट झाली आहे. दाणे भरण्यावर आलेला मूग, उडीद, चवळीच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. दोन ते तीन दिवसांत पाऊस आला नाही तर हातातोंडाशी आलेला घास मातीमोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जळगाव शहराला पाणीपुरवठा ज्या वाघूर धरणावरून होतो त्या वाघूर नदीला यंदा एकही पूर आलेला नाही. गिरणा, अंजनी या नद्यांचीही हीच अवस्था असल्यामुळे पावसाळ्याच्या उत्तरार्धात पाऊस किती साथ देतो? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पाऊस गायब झाल्याने तापमान वाढले आहे. तापमानाचे चटके वाढले असून, उकाडा जाणवतो आहे. रविवारी जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा 36 अंशांवर गेला होता. ६ सप्टेंबरनंतर तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.