आम्ही त्यांना मिठीत घेतलं त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला : आदित्य ठाकरे
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । शिवसेनेच्या गद्दारांना आम्ही शिवसैनिक म्हणून आमच्या मिठीत घेतलं. त्यांना हवं ते दिलं मात्र त्यांनी ठाकरेंच्या किंबहुना माणुसकीच्या पाठीत खंजीर खुपसला. अशी घणाघाती टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर केली.
बंडखोर आमदार व खासदार आता एकनाथ शिंदे गटात गेले असून वेळोवेळी शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर कोणीही टीका जरी करत नसलं तरी देखील आदित्य ठाकरेंवर वेळोवेळी टीका केली जात आहे. सकाळीच गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांनी याआधी महाराष्ट्राचा दौरा केला असता तर आमच्यावर ही वेळ आली नसती असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला. तर दुसरीकडे रामदास कदम यांनी देखील आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.
मात्र आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जागोजागी जिल्हा – जिल्हा फिरत आदित्य ठाकरे शिवसैनिकांची चर्चा करत आहेत. शिवसैनिकांना वेळ देत आहेत. अशाच एका संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोरांवर निशाणा साधला. शिवसेनेने बंडखोरांना आमदारकी, खासदारकी , मंत्रीपद जे हवं ते सगळं दिलं. मात्र या सर्वांनी शिवसेनेची गद्दारी केली अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटून आपला गट स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे समर्थकांवर टीका केली.
दिवाळीपासून हे सर्व कारस्थान सुरू होतं. दिवाळीनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया होत असताना महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे झटत होते. उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसताना देखील ते वेळोवेळी मंत्रिमंडळाशी, जिल्हाधिकाऱ्यांशी, आमदारांशी, खासदारांशी जनतेसाठी बोलत होते. जनतेची सेवा करण्याचे आवाहन करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा फायदा घेत या गद्दारांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
या गद्दारांच्या सामना करण्यासाठी ठाकरे कुटुंबाला व शिवसेनेला शिवसैनिकांच्या प्रेमाची गरज आहे. शिवसैनिकांना स्वतःच्या हक्काचे स्थान निर्माण करायचे आहे. निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवूच. मात्र आता खऱ्या अर्थाने ठाकरे कुटुंबाला शिवसैनिकांची गरज असल्याचे भावनिक साधही यावेळी आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घातली.