जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१। बोदवड तालुक्यातील वराड गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही बोरवेलमधील पाणबुडी मोटर जाळाल्याने या गावाचा पाणीपुरवठा गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. दरम्यान, यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना पैसे येतील तेव्हाच गावाचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे गोलमाल उत्तर दिले जात आहे. त्यामुळे याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
यंदा जिल्हाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे जवळजवळ सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत, त्यामुळे जवळपास वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे. असे असतांना वराड (ता.बोदवड) या गावाला गेल्या १५ दिवसांपासून ‘भिशन पाणी टंचाई’ चा सामना करावा लागत आहे. वराड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दोन्ही बोरवेलमधील पाणबुडी मोटर जळाल्याने १५ दिवसांपासून या गावचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पैसे नसल्याचे कारण
यासंदर्भात तक्रारी घेऊन गेलेल्या नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टीचे पैसे येतील तेव्हाच गावाचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे उत्तर दिले जात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गुलाब चक्रीवादळाचा फटका तालुक्याला बसल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही घरात आलेला नाही, काही शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात ग्रामपंचायतीकडून जेव्हा घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली जाईल तेव्हाच आम्ही पाणीपुरवठा सुरळीत करू आणि मोटारींची दुरुस्ती करू असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.