जळगावकरांना दिलासा! जिल्ह्यातील प्रकल्पांतील जलसाठा गतवर्षापेक्षा अधिक, कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?

एप्रिल 2, 2026 2:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागते. तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते, तर दुसरीकडे जलस्रोतांमधील पाण्याची पातळी हळूहळू घटू लागते. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ अनेक ठिकाणी येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात जळगावकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसत आहे. कारण जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा गतवर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी जास्त आहे.

dam jpg webp

गतवर्षी दि.३० मार्चच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.४४ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र हा जलसाठा ५३.३९ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.

सिंचन विभागाच्या आकडेवारीनुसार, बोरी आणि मन्याड हे प्रकल्प वगळता बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेषतः वाघूर (८०.२७ टक्के), सुकी (७८.१४ टक्के), अभोरा (७६.७३ टक्के) आणि मोर (७०.५४ टक्के) या प्रकल्पांमध्ये भरघोस साठा असल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, बोरी (२०.४४ टक्के) आणि मन्याड (३६.४३ टक्के) या प्रकल्पांमध्ये तुलनेने कमी साठा असल्याने या भागात पाणी व्यवस्थापनाबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. इतर प्रकल्पांमध्ये हतनूर, अग्नावती, मंगरूळ, अंजनी, गूळ आणि शेळगाव बॅरेज येथे मध्यम ते चांगला साठा नोंदवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती समाधानकारक असली तरी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची गरज असल्याचेही सिंचन विभागाने अधोरेखित केले आहे.

३० मार्चचा प्रकल्पनिहाय साठा (टक्के)
प्रकल्प आणि जलसाठा
हतनूर : ५४.३१
गिरणा : ४२.६२
वाघूर : ८०.२७
मन्याड : ३६.४३
बोरी : २०.४४
भोकरबारी : ४४.८६
सुकी : ७८.१४
अभोरा : ७६.७३
अग्नावती : ५७.९७
तोंडापूर : ४६.७२
हिवरा : ३१.४६
मंगरूळ : ५८.७५
बहुळा : ५१.४६
मोर : ७०.५४
अंजनी : ६१.६५
गूळ : ६६.५९
शेळगाव बॅरेज : ६५.२७

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now