⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जलसाठा सरासरी पेक्षाही कमी; जलसंकट उभे राहण्याची भीती

जळगाव लाईव्ह न्यूज| २५ ऑगस्ट २०२३| संपूर्ण पावसाळा समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्याची मोठी समस्या उद्भवणार आहे. पावसाळा आता परतीच्या मार्गावर आला आहे, तरी पुरेशा प्रमाणात जलसाठा उल्पब्ध झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमध्येही जलसाठा अत्यंत कमी आहे.

जिल्ह्यातील जलसाठांमध्ये आतापर्यंत ३८ टक्के जलसाठा असून सप्टेंबर मध्येही पावसाने पाठ फिरवली तर जिल्ह्यात आगामी वर्षभरात मोठे जलसंकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात केवळ जुलै वगळता जुन व ऑगस्ट हे दोन्ही महिने जवळपास कोरडेच गेले आहेत. आगामी आठवडाभरदेखील जोरदार पावसाची शक्‍यता नाही..त्यामुळे आता जिल्हावासियांच्या नजरा केवळ सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.

गेल्या वर्षी २४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये एकूण ६७ टक्के जलसाठा होता. त्यावेळेस त्या तुलनेत यंदा २९ टक्के साठा कमी आहे. जिल्ह्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये सरासरी इतका पाऊस झाला आहे. इतर तालुक्यांमध्ये पावसाची मोठी घट आहे. जिल्हयातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमध्ये सुमारे ९० हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या गिरणा धरणात आतापर्यंत ३७ टक्के जलसाठा आहे.

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या जलसाठ्यात यंदा वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी २४ पर्यंत ऑगस्टपर्यंत गिरणा धरणात ९२ टक्के जलसाठा होता.गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला तर गिरणे वर अवलंबून असलेल्या ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात अभोरा, सुकी, मंगरूळ हे तीनच प्रकल्प पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के भरले आहे. तर मोर, व हिवरा हे दोन प्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक आहे. बहुळा, भोकरबारी, मन्याड या प्रकल्पांमध्ये ही नाममात्र जलसाठा आहे.