⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | बोदवड | बोदवड तालुक्यातील पाणी टंचाई विधानसभेत गाजली; वाचा सविस्तर

बोदवड तालुक्यातील पाणी टंचाई विधानसभेत गाजली; वाचा सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ ऑगस्ट २०२३ | बोदवड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणारी ५१ गावे पाणीपुरवठा योजना ही केवळ कागदावर निर्माण झाली असून, बोदवडवासीयांची तहान भागविण्यास अपयशी ठरलेली आहे, असा संताप आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत केला. लक्षवेधी मांडून आमदार पाटील यांनी या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.

केवळ कागदावर निर्माण झालेली ही अपूर्ण योजना आज रोजी बोदवडवासियांची तहान भागविण्यास अपयशी ठरलेली आहे. ही योजना वाढीव करणार आहात का? बोदवडवासियांना दररोज पाणी देण्यासाठी आपण संवेदनशील आहात का? असा सवाल आमदार पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.

ही योजना १ जानेवारी २०१८ ला पुनर्जीवित होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले, परंतु या योजनेत भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा कुठलाही सारासार विचार न करता प्रति माणसी ४० लिटर पाणी देण्याची तरतूद करण्यात आली, तसेच पाणीपुरवठा यांत्रिकी विभागात देखील अनेक त्रुटी आणि अडचणी ठेवूनही ही योजना तयार करण्यात आल्याचे आमदार पाटील म्हणाले.

ही योजना नव्याने करणे अपेक्षित असताना पुनर्जीवित करून तत्कालीन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेऊन जाणारी पाइपलाइनची क्षमतादेखील कमी करून भविष्यातील लोकसंख्येचा विचार न करता आणि इतर असंख्य त्रुटी व अडचणी याचा सारासार विचार संबंधित विभागाने तोडक्या स्वरूपाची योजना तयार करून कंत्राटदारांच्या घशात घालण्याच्या हेतूने त्रुटी कायम ठेवून योजना पुनर्जीवित करणे, ही योजना पुनर्जीवित करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करून ५ वर्षे उलटूनही जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्यात न येणे आदी मुद्दे आमदार चंद्रकांत पाटील यांनी न उपस्थित केले.

लक्षवेधीवर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की आमदारांनी मांडलेले प्रश्न खरे असून त्यांनी मागणी केल्यानुसार नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात 4 जुलैला आमदार व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडलेली आहे. तरी तत्काळ या संदर्भात उपाययोजना करण्यात येतील, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्षवेधीवर उत्तर देताना आश्वासित केले.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.