⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

कोणताही क्लास न लावता अमळनेरच्या वृष्टी जैनने मारली यूपीएससीत बाजी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । अमळनेर येथील मुंबई गल्लीतील मूळ रहिवासी असलेल्या वृष्टी जैन हिने यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. ती या परीक्षेत ४८४ वी रॅंक मिळवत उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे अमळनेर व नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आरती व संदीप जैन यांची मुलगी असलेल्या वृष्टी हिने प्रबळ मनोधैर्याने शिक्षणास सुरुवात केली. दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवून तिने फ्रावशी अकॅडमी, नाशिक येथून उत्तीर्ण होऊन बी.ए. केले. त्यानंतर तिने मुंबई येथील सेंट झेव्हीयर कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन प्रथम श्रेणीत पदवी मिळवली. शेवटच्या वर्षी तिने मुंबईतीलझोपडपट्टीत जाऊन बऱ्याच मुला-मुलींना शिकवले. त्यावेळी आठ-दहा जणांच्या ग्रुपची ती लीडर होती.

तिने यूपीएससीची तयारी व अभ्यास स्वबळावर केला. त्यासाठी तिने कोणताही क्लास लावला नाही हे विशेष. हार्ड वर्क हा तिचा मूळ स्वभावआहे. तिला वाचन व समाज कार्याची आवड आहे. जैन समाजातील सर्व नियमांचे पालन करून तसेच होस्टेलला राहून तिने हे यश मिळवून जैन समाजाचाही मान वाढवला. वृष्टी ही नेमीचंद भबुतमल चोपडा (जैन) यांची नात व हल्ली नाशिक येथील रहिवासी आरती व संदीप जैन यांची मुलगी आहे. या यशाबद्दल वृष्टी, तिचे पालक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व काैतुक केले जात आहे.