जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । शहरातील कांचननगर परिसरात आज सकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणात शनीपेठ पोलिसात परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलीस ताफ्यासह रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कांचननगर परिसरात असलेल्या बैठक हॉलजवळ आज सकाळी पूर्व वैमनस्यातून आकाश सपकाळे या तरुणाच्या घरात घुसून गोळीबार करण्यात आला होता. घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून पिस्तूलासह संशयितांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या ४७ तासात जिल्ह्यात नशिराबाद आणि जळगाव शहर या दोन ठिकाणी ‘खून का बदला खून’ प्रकारातून गोळीबार आणि प्राणघातक हल्ला झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर हे रात्री ९ वाजता जळगावात पोहचले. १० वाजेच्या सुमारास त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, सहाय्यक अधीक्षक अर्चित चांडक, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शनीपेठ पोलीस ठाण्यात चर्चा करून पुढील तपासासंदर्भात सूचना केल्या.