---Advertisement---
जळगाव जिल्हा

जिल्हा पोलीसदल चालविणारे ‘वशिलेबाज मास्टर’

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीसदलाला गेल्या काही वर्षापासून गटबाजीचे ग्रहण लागले आहे. एकमेकांचे पाय ओढण्यात आणि त्यांना अडचणीत आणण्यातच ते स्वारस्य मानत आहे. एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे निवडक पोलीस कर्मचारी आज जिल्हा पोलीसदलात बाप बनून बसले आहेत. एकाच पोलीस ठाण्यात, एकाच शाखेत आणि एकाच तालुक्यात नोकरी बजावत ते सर्व सूत्रे हलवीत असतात. पुढाऱ्यांशी सलगी, नोकरी व्यतिरिक्त बाहेर असलेल्या व्यवहाराच्या बळावर अधिकाऱ्यांची मर्जी जिंकायची आणि जिल्ह्यात राज्य करायचे असा त्यांचा फंडा आहे. ‘वशिलेबाज मास्टर’ असलेल्या या कर्मचाऱ्यांबद्दल इतरांच्या मनात प्रचंड खदखद असून आपल्याला अशी ‘रॉयल ड्युटी’ बजावता येत नसल्याने खंत देखील आहे.

vashilebaj master running district police force

जळगाव जिल्हा पोलीसदलात गेल्या काही वर्षापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. एकाच पोलीस ठाण्यात किंवा शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एकमत नसल्याने गटबाजी वाढायला लागली. कुठे त्यात जातीय राजकारण शिरले आणि मग सुरु झाला खरा खेळ. एकमेकांचे खच्चीकरण करीत पाय ओढण्यात कर्मचारी घरी बसू लागले. कोणाला कसे अडकवता येईल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कशी माहिती देता येईल या प्रयत्नात सापळे रचले गेले आणि पोलीस दलाची प्रतिमा डागाळली गेली.

---Advertisement---

जळगाव जिल्हा पोलीसदलात ३५ पोलीस ठाणे, लहान मोठ्या चौक्या, आउटपोस्ट आणि मुख्यालयातील काही महत्वाच्या शाखा आहेत. पोलीसदलातील काही कर्मचारी हे एकाच ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत. दरवर्षी होणाऱ्या बदली प्रक्रियेत त्या कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी मुदतवाढ दिली जाते किंवा त्यांच्या सोयीनुसार हवे ते पोलीस ठाणे आणि शाखा मिळत असते. काही महाभाग तर असे आहेत कि नेमणूक कुठे आणि प्रत्यक्षात काम कुठे? अशी परिस्थिती आहे. ‘वशिलेबाज मास्टर’ असलेल्या या दिग्गज कर्मचाऱ्यांचे गोपनीय सूत्रे देखील मजबूत असल्याने त्याचा पोलीसदलाला फायदा होतोच मात्र हेच कारण त्यांची बदली होत नसल्याने इतरांच्या खदखदसाठी कारणीभूत ठरते.

जिल्हा एलसीबीमध्ये संपूर्ण सेवेत एकदा तरी संधी मिळावी अशी अपेक्षा लावून असलेले ८० टक्के पोलीस कर्मचारी असतात परंतु योग्य वशिला नसल्याने त्यांची डाळ शिजत नाही. काही दिग्गज मात्र दोन-दोन वेळा त्याठिकाणी सेवा बजावून आलेले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यात आणि शाखेत देखील काही कर्मचारी केवळ साहेबाची हाजी हाजी करण्यात धन्यता मानतात आणि त्यामुळेच त्यांनी काही विशेष कार्य केले नाही तरी त्यांचे फावले होते. साहेबाकडे वारंवार हजेरी लावली जात असल्याने ते कर्मचारी आपल्याविरोधात काहीतरी काड्या कोरत असल्याचा संशय इतरांच्या मनात निर्माण होतो आणि द्वेषभावनेने मग राजकारण केले जाते.

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पोलीसदलातील या गटबाजीकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. पोलीस कर्मचारी जेव्हा एकजूट होऊन काम करतील तेव्हाच गुन्ह्यांची उकल सहज होणे शक्य आहे. दिग्गज पोलीस कर्मचारी देखील वेगवेगळया ठिकाणी सेवा बजावताना दिसल्यास त्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची देखील उकल होईल. येणाऱ्या वार्षिक बदली कार्यक्रमपूर्वी घेतल्या जाणाऱ्या मुलाखत वारला पोलीस अधीक्षकांच्या सर्व लक्षात येणारच आहे फक्त तेव्हा अधीक्षक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---